
नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. फुग्यात हवा भरताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर दोनजण गंभीर झाले आहेत. ही घटना नागपूर येथील व्हीसीएग्राऊंड परिसरात घडली आहे. जखमींना येथील मेयो रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्फोटाचे नेमके कारण समजले नसून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
सिझान आसिफ शेख (4) असे मृत मुलाचे नाव आहे. तर फारिया हबीब शेख (28), अनमता हबीब शेख (24) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसवरचे फुगे विकणारा एक व्यक्ती नागपुरातील जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात आला होता. फुगेवाला आल्याने सिझानने फुगे घेण्याचा हट्ट धरला. त्यामुळे फुगे घेण्यासाठी ते फुगेवाल्याकडे गेले. फुगा फुगवताना अचानक त्याच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. मोठा आवाज आल्याने आजूबाजूची लोकं देखील घाबरली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र चिमुकल्या सिझानचा जागीच मृत्यू झाला होता. तर जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले. फुगेवाल्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.या स्फोटामध्ये फुगेवाला जखमी झालेला नाही.































































