
जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या 20 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान होणार आहे.
सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार लेखक प्रकाश मगदुम यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या ‘द महात्मा ऑन सेल्युलॉइड’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामाकरिता फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना ‘सत्यजित रे’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
20 व्या ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’ची प्रतिनिधी नोंदणी 5 जानेवारीपासून सुरू झाली असून www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. तसेच सिटीलाइट सिनेमा, माहीम, कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स आणि पीव्हीआर सिनेपोलीस, ठाणे येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 प्रत्यक्ष सशुल्क नोंदणी करता येईल.































































