
मला पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक सकारात्मक व्यक्ती भेटल्या. त्यांच्याकडून मला पॉझिटिव्हिटी मिळत गेली, सांगतेय अभिनेत्री रेश्मा शिंदे.
ग्लास अर्धा भरलेला आहे असे म्हणण्यापेक्षा मी तो पूर्ण भरीन आणि तेवढी ताकद माझ्या मनगटामध्ये आहे हा विश्वास मी माझ्या आत सतत रुजवत असते. पुष्कळदा नैराश्य येते आणि तेव्हा वाटते की, मी यातून बाहेर कशी पडू? त्यासाठी एक छोटासा प्रयोग सांगते. ज्या क्षणी नैराश्य, मरगळ येते तो क्षण झटकून टाकायचा आणि इतर गोष्टींकडे आपले मन वळवायचे. जितके बोलते आहे मी तितके सोपे नसते ते मलाही ठाऊक आहे. पण हे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नसते. सातत्याने स्वतःवरती विश्वास ठेवला की, मग एक अनामिक पॉझिटिव्हिटी शरीराच्या अणूरेणूमध्ये व्यापून उरते. आपण आपल्याला एक वचन द्यायचे. स्वतःवरती विश्वास ठेवायचा. स्वतःवरती जिवापाड प्रेम करायचे. जर ठरवले की, आज मी दहा मिनिटे मेडिटेशन करीन तर ते नक्कीच करा. जर ठरवले वीस मिनिटे व्यायाम करेल तर कराच करा. एखाद्या छंदात मन गुंतवावेसे वाटले तर ते न विसरता करा. स्वतःला दिलेली कमिटमेंट मोडू नका आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी साकारलेल्या भूमिकांनीही मला पॉझिटिव्हिटी दिली आहे.
आजकाल काही न्यूज चॅनल केवळ लाइक्स मिळण्यासाठी इतक्या नकारात्मक गोष्टी सातत्याने दाखवत असतात की, सातत्याने असे पाहूनसुद्धा निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते ते आपण आवर्जून टाळायला हवे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा आपण सकारात्मक रीतीने वापर करून आपल्यात चांगले बदल घडवायला हवेत. निसर्गाने जे आपल्याला बुद्धीचे दान दिलेले आहे त्याचा आपण योग्य पद्धतीने उपयोग करायला हवा आणि चांगला माणूस बनून माणसाने माणसाशी माणसासारखे वागायला हवे.
‘रंग माझा वेगळा’मधील दीपा ही स्वतःच्या रंगाचा न्यूनगंड न बाळगता पॉझिटिव्हिटीच बळ पंखांमध्ये घेऊन आकाशाला गवसणी घालणारी होती. तशीच नुकतीच माझी नवीन मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ यातील जानकी ही व्यक्तिरेखासुद्धा पॉझिटिव्हिटीने भरलेली आहे. एकत्र कुटुंबपद्धतीवरती प्रेम करणारी ही जानकी. आपली माणसे प्रेमाने व आपुलकीने, जिव्हाळय़ाच्या रेशमी धाग्यांनी बांधणारी जानकी साकारण्यासाठी व पुन्हा प्रेक्षकांचे प्रेम नव्याने अनुभवायला मी खूप उत्सुक आहे. मला खात्री आहे माझ्यातली सकारात्मकता जानकीमध्ये जाईल आणि सकारात्मक जानकीला मी माझ्यात सामावून घेईन.
माझ्या आयुष्याचा एक ब्रीदवाक्य आहे. ‘पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त.’ म्हणजेच येणारा प्रत्येक दिवस कधीच एकसारखा नसतो. पुष्कळ गोष्टी मनासारख्या होत नाहीत. एखादा प्रोजेक्ट हातातून निसटून जातो. असे काहीही मनाविरुद्ध घडले की, मनावर आलेली मरगळ झटकून दरवेळी मी हेच म्हणते ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!’ अजून आयुष्य प्रचंड जगायचे व उपभोगायचे आहे. आयुष्यात येणाऱया प्रत्येक क्षणाचा चांगल्या कामासाठी विनियोग करायचा आहे आणि म्हणूनच ‘पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त!’
शब्दांकन: निनाद पाटील



























































