
माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा, असे निवेदन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी जारी केले आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीत गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात असून एका निवेदनाद्वारे अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवण्यासाठी बजावले आहे. ‘1982 पासून मी सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे तसेच निष्ठsने राजकारण आणि समाजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही निःस्वार्थपणे सेवा केली, असे घोसाळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा, पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढय़ाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा तीव्र भावना घोसाळकर यांनी निवेदनात व्यक्त केल्या आहेत.
अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी शोकसभा
शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुंबै बँकेचे माजी संचालक अभिषेक घोसाळकर यांची शोकसभा गुरुवार, 15 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. शोकसभा बोरिवली पश्चिम येथील न्यू लिंक रोडवरील ओरा हॉटेलसमोर असलेल्या कच्छी ग्राऊंडवर होणार आहे.































































