
राज्यातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. पण धरणांमधील पाणीसाठा खालावत चालला आहे. त्यामुळे राज्यात पाणी पुरवठा करणाऱया टँकरच्या संख्येने विक्रमी उच्चांक गाठला आहे. राज्यातल्या 11 हजारांहून अधिक वाडय़ावस्त्यांना तब्बल 3 हजार 700 हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.
राज्याच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीने राज्याच्या टँकरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार राज्यातल्या 25 जिह्यांतील भीषण परिस्थिती पुढे आली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर होत जाण्याची भीती पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. राज्यातील धरणे, नद्या, विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे गावागावांमध्ये टँकरवर पूर्ण भिस्त आहे. आदिवासी पाडय़ांमध्येही भीषण पाणीटंचाई असून घोटभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.
अभूतपूर्व परिस्थिती
गेल्या वर्षी याच दिवशी सुमारे 1300 गावांना फक्त 305 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात होता, पण यंदा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोकणातील परिस्थिती
कोकणात लहान-मोठी मिळून एकूण 173 धरणे आहेत. या धरणांमध्ये मिळून 35.88 टक्के पाणीसाठा आहे.
टँकरची संख्या
ठाणे 47
रायगड 47
रत्नागिरी 24
पालघर 50
नाशिक 390
धुळे 10
जळगाव 108
नगर 336
पुणे 256
सातारा 202
सांगली 108
सोलापूर 207
छत्रपती संभाजीनगर 708
जालना 519
बीड 433
धाराशीव 146
राज्यातल्या एकूण 25 जिह्यांमधील 3 हजार 72 गावे आणि तब्बल 7 हजार 931 वाडय़ांमध्ये एकूण 3 हजार 761 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
राज्यात सर्वाधिक म्हणजे 1 हजार 874 टँकरने पाणी पुरवठा संभाजीनगर विभागात होत आहे.
धरणे आटली
राज्यात सर्व लहान-मोठय़ा धरणांची संख्या 2 हजार 997 आहे. या धरणांमधील पाणीसाठा फक्त 22.64 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा 31.81 टक्के होता.



























































