
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने रविवारी स्पेस डॉकिंग प्रयोगाची (स्पाडेक्स) यशस्वी चाचणी घेतली. इस्रोने दोन अवकाश उपग्रहांमधील अंतर प्रथम 15 मीटर, नंतर 3 मीटर ठेवले. दोन्ही उपग्रह हॅण्डशेकसाठी तयार होते. यानंतर दोन्ही उपग्रहांना पुन्हा सुरक्षित अंतरावर नेण्यात आले. इस्रोने सांगितले की, डॉकिंग चाचणीचे डेटा विश्लेषण केले जात आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. इस्रोने 30 डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून रात्री 10 वाजता स्पाडेक्स म्हणजेच अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम सुरू केली होती. याअंतर्गत पीएसएलव्ही- सी 60 रॉकेटच्या साहाय्याने पृथ्वीपासून 470 किमी वर दोन अंतराळ यान तैनात करण्यात आले. इस्रोने स्पेसएक्स मिशनचे डॉकिंग दोनदा पुढे ढकलले आहे. प्रथम 7 जानेवारी आणि नंतर 9 जानेवारीला डॉकिंग करण्यात येणार होते. मात्र ते होऊ शकले नाही. 12 जानेवारी रोजीच्या दोन्ही उपग्रह रात्रभर 230 मीटरवरून 105 मीटर अंतरावर आणण्यात आले. 15 मीटर अंतरावरून एकमेकांशी हॅण्डशेक करण्यास तयार असल्याचे इस्रोने सांगितले. तिथून पुढे दोन्ही उपग्रह तीन मीटरपर्यंत जवळ आणून अंतिम डॉकिंगची कमांड देण्याचे ध्येय होते. अंतिम डॉकिंगपूर्वीची सर्व खबरदारी इस्रोने घेतली होती.

























































