2000 रुपयांच्या नोट बंदीनंतरही 6181 कोटी रुपयांच्या नोटा चलनात; RBI ची मोठी माहिती

केंद्रीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयाला दोन वर्षे झाली आहेत. मात्र, आजही हजारो कोटी रुपयांच्या या नोटा अजूनही लोकांकडे आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चलनातून बाद झालेल्या 2000 रुपयांच्या नोटांबाबत मोठी माहिती दिली आहे. अधिकृत आकडेवारी जारी करताना RBI ने म्हटले आहे की 2023 मध्ये 2000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर आतापर्यंत 6181 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही चलनात आहेत.

RBI ने चलनातून बंद केलेल्या 2000 रुपयांच्या नोटा परत आल्याबाबतचा डेटा जारी केला आहे. आरबीआयने म्हटले आहे की 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 98.26 टक्के नोटा परत आल्या आहेत. मात्र, 31 मे 2025 पर्यंत 6181 कोटी रुपयांच्या नोटा अद्याप परत आलेल्या नाहीत. या नोटा बंद करण्यात आल्या तेव्हा 3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या.

2000 रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर चलन आहेत आणि आरबीआय लोकांना त्या परत करण्यासाठी आवाहन करत असते. 19 मे 2023 रोजी या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या तेव्हा RBI ने 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व बँकांच्या शाखांमध्ये या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांची संख्या कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने नोट बदलण्याची सुविधा त्यांच्या 19 कार्यालयांपर्यंत मर्यादित केली. जिथे या नोटा अजूनही बदलल्या जाऊ शकतात. रिझर्व्ह बँकेची ही कार्यालये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत. त्याठिकाणी या नोटा बदलता येऊ शकतात.