
पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, घरात एकट्या असलेल्या संगणक अभियंता तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने कुरिअर असल्याचे सांगत तरुणीला घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्या डोळ्यात पेपर स्पे मारून आरोपीने अत्याचार केला. ही घटना 2 जुलैला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंढव्यात घडली. याबाबत 22 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची मिळून 10 पथके रवाना केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पंढरपूरच्या दर्शनासाठी चाललेल्या कुटूंबियाला कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावानजीक महामार्गावरील अत्याचाराची घटना ताजी असून, आरोपी अजूनही पसार आहे.
पीडित तरुणी माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला असून, कोंढव्यातील उच्चभ्रु सोसायटीत भावासोबत राहायला आहे. तिचा भाऊ परगावी गेला असल्यामुळे बुधवारी दि. 2 जुलैला सायंकाळी तरुणी एकटीच घरात होती. त्यावेळी कुरिअर बॉय बनून आलेल्या आरोपीने तरूणी राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा वाजविला. तिने सेफ्टी डोअर उघडला असता, आरोपीने बँकसंदर्भात तिचे कुरिअर असल्याची बतावणी केली. त्याचवेळी तरुणीने माझे कोणतेही कुरिअर नसल्याचे सांगितले. तेव्हा आरोपीने कुरिअर कागदपत्रांवर सही करावी लागेल, असे तिला सांगितले.
त्यानंतर आरोपीने तरुणीला बोलण्यात गुंतवून सेफ्टी दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर पेपर प्रे मारला. त्यानंतर आरोपी तिला घेऊन घरात शिरला. आरोपीने तरुणीला धमकावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढली. जर कोणाला काही बोललीस तर परत येईन, असा संदेश त्याने पीडितेच्या मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे.