
हिंदुस्थानच्या दिशेने एक नवेच संकट येण्याची शक्यता आहे. इथिओपिया या देशातील गेल्या 10 हजार वर्षांपासून सुप्त असलेला हॅले गुब्बी नावाचा ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला. त्यामुळे लाल समुद्राला लागून असलेल्या आखाती देशांवर राख आणि विषारी वायुचे ढग पसरले आहेत. ते सोमवारी रात्री उशीरा दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे काही विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने देशातील सर्व विमान कंपन्यांना अलर्ट जारी केला आहे.
हॅले गुब्बी हा ज्वालामुखी इथिओपियातील अफार प्रदेशात आहे. तो सुमारे 10 हजार वर्षांपासून शांत होता. मात्र, अचानक झालेल्या उद्रेकामुळे शास्त्रज्ञांचे लक्ष त्याकडे वेधले आहे. हा भाग अतिशय दुर्गम असून तेथे कोणतीही मॉनिटरिंग यंत्रणा नाही. स्पह्ट झाल्यानंतर राख आणि सल्फर डायऑक्साइडचे मिश्रण असलेले ढग आकाशात सुमारे 15 किलोमीटर उंचीपर्यंत दाटले आहेत. ते हिंदुस्थानच्या दिशेने सरकत राजस्थान, पंजाब आणि दिल्लीपर्यंत सोमवारी रात्री उशीरा पोहोचले. त्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अकासा, इंडिगो तसेच केएलएम या पंपन्यांनी काही उड्डाणे रद्द केली आहेत.

























































