
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात गेली अनेक वर्षे एमआरआय मशीन बंद असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून त्यांना जादा पैसे मोजून खासगी ठिकाणाहून एमआरआय रिपोर्ट काढावे लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड बसतो. या गंभीर प्रश्नावर शिवसेनेने आज विधान परिषदेत आवाज उठवला. त्यावर नायरसह कूपर, केईएम, लोकमान्य टिळक या पालिकेच्या चार रुग्णालयांत येत्या पाच ते सहा महिन्यांत एमआरआय मशीन उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले.
पालिकेच्या नायर रुग्णालयामधील एमआरआय मशीन गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे नवीन एमआयआर मशीन तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत मांडली. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, नायरमध्ये एमआरआय मशीन 23 नोव्हेंबर 2023 पासून बंद आहेत. येथील रुग्णांची एमआरआयसाठी पर्यायी व्यवस्था धारावीतील छोटा शीव रुग्णालयात केली जाते. त्यासाठी त्यांना मोफत रुग्णवाहिका सेवा दिली जाते. नायरसह कूपर, केईएम, लोकमान्य टिळक या रुग्णालयांत एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने 1 सप्टेंबर 2025 रोजी निविदा प्रक्रिया राबवली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत वर्क ऑर्डर होईल. जर्मनीच्या मशीन असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात येतील. पुढील सहा महिन्यांत या चारही रुग्णालयांत एमआरआय मशीन कार्यान्वित होतील.
निविदा प्रक्रियेला कालमर्यादा असावी
पालिकेने एमआरआय मशीनसाठी अकरा-बारा वेळा निविदा काढल्या, परंतु सिंगल बिडर आल्यामुळे ही प्रक्रिया पुढे सरकली नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेला ठराविक कालमर्यादा असावी, याकडे सुनील शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर दोन वेळा टेंडर निघाले असेल आणि तिसऱया वेळी सिंगल बिडर आला तरी त्या मंजूर करण्याचा निर्णय महापालिकेने घ्यावा असे आदेश महापालिका अधिकाऱयांना देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
























































