
आयकर विभागाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपल्या हँडलवर एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधील व्यवसायाची तपासणी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आयकर विभागाने देशभरातील रेस्टॉरंट्सच्या अन्न विक्रीची तपासणी केल्यानंतर सुमारे ४०८ कोटी रुपयांचा व्यवहार लपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. करचोरी रोखण्यासाठी विभागाने राबवलेल्या देशव्यापी मोहिमेनंतर ही माहिती समोर आली आहे.
सोमवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, आयकर विभागाने ८ मार्च रोजी २२ राज्यांमधील ४६ शहरांमधील ६२ रेस्टॉरंट्सचे सर्वेक्षण केले. ‘फूड अँड बेव्हरेज’ (F&B) क्षेत्रातील करचोरीच्या पद्धतींचा शोध घेण्यासाठी ही तपासणी करण्यात आली होती.
आयकर विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘८ मार्च २०२६ रोजी २२ राज्यांमधील ४६ शहरांमधील ६२ रेस्टॉरंट्सवर देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले. प्राथमिक तपासणीत सुमारे ४०८ कोटी रुपयांची विक्रीची माहिती लपवल्याचे (Suppression of sales) समोर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.’
KIND ATTENTION TAXPAYERS!
✅Income tax Department carries out nation-wide verification exercise on Restaurants suppressing turnover
✅The Department commences SAKSHAM NUDGE campaign to guide and advise taxpayers to correct their mistakes.
✅In the first phase, emails and… pic.twitter.com/MRt0OM1iLu— Income Tax India (@IncomeTaxIndia) March 9, 2026
अशी केली जात होती करचोरी
नोव्हेंबर २०२५ मध्ये करण्यात आलेल्या एका तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. काही रेस्टॉरंट्स आपला टर्नओव्हर कमी दाखवण्यासाठी बिलिंग रेकॉर्डमध्ये फेरफार करत असल्याचे पुरावे अधिकाऱ्यांना मिळाले होते. अनेक व्यावसायिक आपल्या सिस्टममधून मोठ्या प्रमाणात बिले डिलीट करत होती आणि विक्रीची प्रत्यक्ष आकडेवारी लपवण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करत असल्याचे विभागाने म्हटले आहे.
AI च्या मदतीने पकडली चोरी
या तपासासाठी विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. ‘F&B क्षेत्रातील सुमारे १.७७ लाख रेस्टॉरंट्सच्या व्यवहारांच्या डेटाचे ‘एआय’ (AI-enabled) विश्लेषणात्मक साधनांद्वारे परीक्षण करण्यात आले. या डेटाची तुलना त्यांनी आयकर रिटर्नमध्ये (ITR) जाहीर केलेल्या टर्नओव्हरशी करण्यात आली. यामध्ये उत्पन्नाची माहिती कमी दिल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून आले. काही प्रकरणांमध्ये, नोंदवलेली विक्री आर्थिक खात्यांमध्ये किंवा टॅक्स फायलिंगमध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित झाली नव्हती,’ असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘सक्षम नज’ (SAKSHAM NUDGE) मोहीम
केवळ कारवाई न करता, करदात्यांनी स्वतःहून त्रुटी सुधारून नियमांचे पालन करावे यासाठी विभागाने ‘सक्षम नज’ मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात डेटा विश्लेषणातून माहिती मिळालेल्या सुमारे ६३,००० रेस्टॉरंट्सना ईमेल आणि मेसेज पाठवले जाणार आहेत.
या आस्थापनांना ३१ मार्च २०२६ पूर्वी त्यांचे टॅक्स रिटर्न तपासून अपडेट करण्यास सांगितले जाईल. आयकर कायद्याच्या कलम १३९(८ए) अंतर्गत सुधारित रिटर्न (Revised Returns) दाखल करून त्यांना आपली चूक सुधारण्याची संधी दिली जाणार आहे.
आता या संधी अंतर्गत रेस्टॉरंट किती व्यावसायिक लपवलेले व्यवहार उघड करून पैसे भरणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

























































