
बँकेच्या कामाच्या बहाण्याने नंबर मिळवून महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज पाठवल्याची घटना बंगळुरूत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एका 40 वर्षीय व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. के.आर. रवी शेट्टी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आोरपीने बंगळुरूतील एका राष्ट्रीयकृत बँकेतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवी शेट्टी हा 10 मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कचरकनहल्ली शाखेत इंटरनेट बँकिंगच्या चौकशीसाठी गेला होता. तेथे त्याने आपली व्यावसायिक माहिती सांगत पीडित महिला कर्मचाऱ्याशी संवाद साधला. महिलेशी बोलता बोलता त्याने आपला मोबाईल नंबर देऊन तिला मिस कॉल देण्यास सांगितले.
मिस कॉलच्या बहाण्याने महिलेचा नंबर मिळवून त्याच रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आरोपीने तिला अत्यंत अश्लील आणि लैंगिक टिप्पण्या असलेले मेसेज पाठवले. पीडित महिलेने त्याला कडक शब्दांत समज देऊनही त्याने मेसेज थांबवले नाहीत.
दुसऱ्या दिवशी पीडित महिलेने बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांना ही बाब सांगितली. यानंतर व्यवस्थापकांनी आरोपीला फोन करून जाब विचारला असता त्याने सुरुवातीला माफी मागण्याचे नाटक केले. मात्र, त्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्याने व्यवस्थापकालाच एक आक्षेपार्ह मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये त्याने स्वतःमध्ये आणि पीडित महिलेमध्ये तडजोड घडवून आणण्याची निर्लज्ज मागणी केली.
यानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी आरोपी रवी शेट्टीविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS), 2023 च्या कलम 75(2) (लैंगिक छळवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.


























































