
युरोप, अमेरिका आणि अरब देशांच्या सीमा ओलांडून युद्धाच्या ज्वाळा आता जगभर पसरल्या आहेत. इराण विरुद्ध अमेरिका, रशिया विरुद्ध युव्रेन युद्ध पेटलेले असतानाच आज आशिया खंडात संघर्षाची ठिणगी पडली. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला. तर, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्यासह 300 सैनिक मारले गेले. या हल्ल्यानंतर इराणने हिशेब चुकता करण्याची धमकी दिल्याने जगाचे टेन्शन वाढले आहे.
अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर लारीजानी यांनीच अमेरिका विरुद्धच्या युद्धाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली इराणी लष्कराने अमेरिका व इस्रायलला पळता भुई थोडी केली होती. त्यामुळे अमेरिका व इस्रायलचे सैन्य त्यांच्या मागावर होते. त्यांना आज इस्रायलने मारले. लारीजानी यांच्यासह इराणच्या निमलष्करी दलाचे कमांडर गोलारेजा सोलेमनी हेही मारले गेले. इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्झ यांनी तसा दावा केला.
ट्रम्प यांच्यावर आरोप करत दहशतवादविरोधी प्रमुखाचा राजीनामा
इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नव्हता. हे युद्ध इस्त्र्ाायलच्या दबावामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केले आहे, असा थेट आरोप करीत अमेरिकेचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख जो पेंट यांनी राजीनामा दिला आहे. युद्ध काळातच विश्वासू सहकाऱयाने राजीनामा दिल्याने ट्रम्प यांना जोरदार झटका बसला आहे.
वाट्टेल ते करेन! क्युबावर कब्जा करण्याची ट्रम्प यांची धमकी
इराण युद्धामुळे तोंड पोळलेले ट्रम्प यांची दादागिरी कायम आहे. व्हेनेझुएलाप्रमाणे क्युबा हा देश ताब्यात घेण्याची जाहीर धमकी त्यांनी आज दिली. ‘क्युबासोबत मी काहीही करू शकतो. क्युबाला स्वातंत्र्य मिळवून देईन, तो देश ताब्यात घेईन. अगदी वाट्टेल ते करेन. क्युबा हा आजघडीला अत्यंत कमकुवत देश आहे,’ असे ट्रम्प म्हणाले.
यूएईच्या गॅस साठय़ावर इराणने ड्रोन डागले
प्रत्युत्तर म्हणून इराणने यूएईतील सर्वात मोठय़ा नैसर्गिक वायू साठय़ांना लक्ष्य करत ड्रोन डागले. ‘शाह फिल्ड’ नावाने ओळखल्या जाणाऱया या साठय़ांचे इराणच्या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी आणि अमेरिकेची ऑक्सिडटल पेट्रोलियम कॉर्पोरेशन हे संयुक्तपणे येथे उत्खनन करतात. येथील काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
मोजतबा खामेनी यांनी युद्धविरामाचा प्रस्ताव धुडकावला
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अमेरिकेसोबत शांतता चर्चेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. दोन त्रयस्थ देशांनी इराणला अमेरिकेसोबत चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र आधी अमेरिका आणि इस्रायलचा हिशेब चुकता करू, नंतर शांततेचं बघू, असे त्यांनी ठणकावले आहे. ‘अमेरिका-इस्रायलने आधी नुकसानभरपाई द्यावी, त्यानंतरच शांततेची चर्चा होऊ शकते, असे खामेनी यांचे स्पष्ट म्हणणे असल्याचे इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ट्रम्प म्हणाले… इराणच्या वाटेला जायला नको होते!
तब्बल दोन आठवडे इराणने केलेल्या जबरदस्त प्रतिकारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती झाली आहे. त्यांचे सूर बदलले आहेत. ‘आमच्या देशात सर्वात जास्त तेल आहे. आम्ही इराणच्या वाटेला जायलाच नको होते,’ असे वक्तव्य त्यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘इराणी लोक खूपच बुद्धिमान आहेत. बुद्धिबळाप्रमाणे चाली खेळत आहेत. ते खूपच स्मार्ट आहेत,’ अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणी लोकांची व तेथील नेत्यांची स्तुती केली.
पाकिस्तानचा अफगाणवर हल्ला; 407 ठार
आखातात युद्ध पेटलेले असतानाच सोमवारी रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 408 जण मृत्युमुखी पडले असून 250 हून अधिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तान दहशतवादाला आश्रय देत असल्याचा आरोप करत पाकिस्तानने हा हल्ला केला. ड्रग्जच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या तब्बल दोन हजार खाटांच्या रुग्णालयावर हा हल्ला करण्यात आला. यात अर्ध्याहून अधिक रुग्णालय उद्ध्वस्त झाले, तर अडीचशेहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची स्थिती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने रुग्णालयावर केलेला हल्ला हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे, असा संताप तालिबानच्या प्रवक्त्याने व्यक्त केला.
हिंदुस्थानकडून निषेध
अफगाणिस्तानातील रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा हिंदुस्थान सरकारने तीव्र शब्दांत निषेध केला. ‘हे एक रानटी आणि भ्याड कृत्य आहे. कोणत्याही परिस्थितीत या हल्ल्याचे समर्थन होऊ शकत नाही. हा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा आणि प्रादेशिक शांतता व स्थैर्याला बाधा आणणारा हल्ला आहे,’ असे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले.
































































