‘लॉजिस्टिक्स’ अभ्यासक्रमामुळे मराठी तरुणांना जगाचे दरवाजे उघडतील! उद्धव ठाकरे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकऱ्या मिळवण्यासाठी केवळ मोर्चे काढून चालणार नाही. आंदोलनाने कंपन्यांची दारे उघडतील, पण दाराच्या आत जाता येणार नाही. आत जायचे असेल तर आवश्यक कौशल्य पाहिजे. आता लॉजिस्टिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकऱयांसाठी नवे क्षिजित निर्माण होत आहे. जगाचे दरवाजे उघडतील, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि इंडियन इस्टिटय़ूट ऑफ फ्रेट फॉरवर्डस्च्या संयुक्त विद्यमाने (एफएफएफएआयची शिक्षण शाखा) एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्स सुरू करण्यात आला आहे.

शिवसेना भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एफएफएफएआयचे अध्यक्ष अमित कामत, माजी अध्यक्ष शंतनू भडकमकर, दुश्यंत मुलानी, समीर शहा, नाना हळदणकर व संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला शिवसेना नेते दिवाकर रावते, अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब, अंबादास दानवे, आमदार सुनील शिंदे, अजय चौधरी, महेश सावंत, विलास पोतनीस, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, माजी महापौर महादेव देवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिहिर भडकमकर यांनी केले. एफएफएफएआयचे अध्यक्ष अमित कामत यांनी या अभ्यासक्रमातून उपलब्ध होणाऱया नोकरीच्या संधी यांची माहिती दिली. एफएफएफआयएचे माजी अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी लॉजिस्टकमधून देश आणि विदेशात नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात याची माहिती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राजकारण आणि लॉजिस्टिक

लॉजिस्टिक हा विषय आमच्यासाठी वेगळा आहे. कारण आम्ही राजकारणी आहोत. आम्हाला राजकारणातील लॉजिस्टिक कळते. म्हणजे आमचे आमदार कुठून कुठे गेले, कसे गेले, कोणासोबत गेले हे बघतो आणि उत्पादक बोंबलत बसलाय असे हे आमचे लॉजिस्टिक, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच सभागृहात हास्याचा स्फोट झाला.

लॉजिस्टिक्स आणि हॉकी स्टीक

सुरुवातीच्या काळात नोकऱया मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी लॉजिस्टिकऐवजी हॉकी स्टीकचा उपयोग जास्त केला होता, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच पुन्हा एकदा हास्याचा स्पह्ट झाला. नोकऱया मिळवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे शिवसेना आजपर्यंत वाटचाल करीत आलेली आहे.

…आणि एअर इंडियाचे दरवाजे उघडले

एअर इंडियात मराठी माणसांना नोकरी देण्यासाठी शिवसेनेने मोर्चा काढला होता तेव्हा सुधीर जोशी होते. आणि एअर इंडियाचे नंदा नावाचे जनरल मॅनेजर होते. शिवसेनाप्रमुखांनी नंदाचाच इंटरह्यू घेतला. मराठी माणसाला नोकरी देत नाही म्हणाल्यावर एकच आवाज निघाला. कानात जे गेले नाही ते कानाखाली गेल्याबरोबर एअर इंडियाचे दरवाजे उघडले, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

पाच शनिवार कोर्स

शिवसेना भवनमध्ये हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. पाच आठवडे दर शनिवारी सहा तासांचा वर्ग असेल. विद्यार्थ्यांना आयात-निर्यात, लॉजिस्टिक याच्यासह विमानतळ आणि बंदरातील मालवाहतुकीची माहिती देण्यासाठी भेटी आणि लॉजिस्टिक या विषयातील तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल तसेच पंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामाचा अनुभवही दिला जाईल. अधिक माहितीसाठी शिवसेना भवनमधील स्थानीय लोकाधिकार समितीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात अभ्यासक्रम सुरू करा

राज्यात विविध ठिकाणी लॉजिस्टिक्स कोर्स सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवीन क्षेत्र निर्माण होत आहे. शिवसेनेने पैसे कमवायला शिकवले. स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले. आता आयुष्यात यशस्वी होण्याचे शिक्षण दिले जाणार आहे.

महाराष्ट्राचे नाव मोठे करा

जगभरात कुठेही जा, महाराष्ट्राचा देशाला अभिमान वाटेल असे काम करा. मराठी माणूस हक्काचे, न्यायाचे मागतो आहे. उपकाराचे ओझे आम्ही वाहत नाही, असा संदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.