
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्ध समाप्तीच्या संकेतांमुळे दोन दिवसांमध्ये शेअर बाजारात जबरदस्त तेजी आली आहे. बुधवारी शेअर बाजारात सर्वत्र तेजी असून अनेक शेअर रॉकेट बनले आहेत. तर सेन्सेक्स आणि निफ्टीनेही जबरदस्त उसळी घेतली आहे. तसेच सोनेचांदीचे दरही वाढले आहेत. हे बाजारातील तेजीचे संकेत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी शेअर बाजार रॉकेट बनला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच वेगाने ७५,००० चा टप्पा ओलांडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही 23 हजाराचा टप्पा पार केला आहे.
बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात वेगवान तेजी दिसून आली आहे. बुधवारी ट्रेडिंगच्या सुरुवातीला दोन्ही निर्देशांक रॉकेटच्या वेगाने वाढताना दिसले. सेन्सेक्सने जोरदार सुरुवातीनंतर काही वेळाच १,२०० अंकांनी उसळी घेत ७५,००० चा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनेही ४०० अंकांची वाढ नोंदवत 23 हजाराचा टप्पा पार केला.
सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तेजीमुळे १,७९५ शेअर्स त्यांच्या मागील बंद भावापेक्षा मोठ्या वाढीसह उघडले. दरम्यान, ४६७ शेअर्स तोट्यात उघडले. याशिवाय, १४३ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही, म्हणजेच त्यांची सुरुवात सपाट होती. सेन्सेक्स निर्देशांक त्याच्या मागील बंद भावाच्या ७४,०६८ वरून वाढून ७४,६५२ वर उघडला आणि त्यानंतर व्यवहाराच्या काही मिनिटांतच ७५,००० चा टप्पा ओलांडला.
सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीनेही प्रचंड वेगाने उसळी घेतली. मंगळवारी निर्देशांक २२,९१२ वर बंद झाला आणि बुधवारी तो २३,०६४ वर उघडला. दमदार सुरुवातीनंतर, त्याने अचानक रॉकेटप्रमाणे झेप घेतली आणि जवळपास ४०० अंकांनी उसळी घेत २३,३०४ वर पोहोचला. 11.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1472.22 अंकांच्या म्हणजेच 1.99% वाढीसह 75,540.67 वर व्यवहार करत होता. निफ्टी 454.85 म्हणजेच 1.99% वाढीसह 23,381 . 80 वर व्यवहार करत होता. तर बँक निफ्टी 1,203.25 अंकांच्या म्हणजेच 2.29% वाढीसह 53,905 . 40 वर व्यवहार करत होता.
शेअर बाजारातील तेजीला अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचा आधार मिळाला. बीएसई लार्ज कॅपमध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्टॉक्समध्ये ट्रेंट शेअर (४%), अदानी पोर्ट्स शेअर (३.५०%), एलटी शेअर (३.२०%), बजाज फायनान्स शेअर (३%), टायटन शेअर (२.९०%), एम अँड एम शेअर (२.८०%), आणि एचडीएफसी बँक शेअर (२.६०%) यांचा समावेश होता, तर एसबीआय शेअर (२.२०%) वाढीसह व्यवहार करत होता. इंडिगो आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्येही २ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, अमेरिका-इराण युद्ध समाप्तीचे संकेत आणि जागतिक बाजारात तेजी असल्याने मिळालेले सकारात्मक संकेत यामुळे बुधवारी बाजारात तेजी दिसून आली. परदेशी बाजारांमधून आलेल्या सकारात्मक संकेतांमुळे जवळपास सर्वच आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली.

























































