
मध्य पूर्वेतील युद्धात आता दिवसागणिक नवनवीन घडामोडी घडत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा इराणला गर्भित इशारा दिला आहे. हा इशारा देत ट्रम्प म्हणाले, आम्ही होर्मुझ सामुद्रधुनी मधील टोल दोन मिनिटांत बंद करु शकतो. त्याचबरोबर या विषयावर अधिक बोलताना ट्रम्प म्हणाले, आम्ही इराणचे तेल तर घेऊच, पण खार्ग बेटही ताब्यात घेणार आहे असे ट्रम्प यांनी फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “खरं सांगायचं तर, इराणचं तेल मिळवणं ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे.” रविवारी फायनान्शिअल टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांना इराणचं तेल मिळवायला आवडेल आणि त्यांनी असेही सूचित केले की, अमेरिका तेलाच्या निर्यातीचे प्रमुख केंद्र असलेले खार्ग बेट ताब्यात घेऊ शकते.
इतकेच नव्हे तर, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्याच्या इराणच्या योजनेच्या वृत्तांबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनाही विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, “आम्ही ते २ मिनिटांत बंद करू शकतो. आम्ही ते इतक्या वेगाने बंद करू शकतो की तुमचे डोके गरगरून जाईल,” असे ते म्हणाले.
सौदी अरेबिया, कतार, यूएई आणि बहरीन यांसारखे देश इराणला प्रत्युत्तर देत आहेत, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले. ट्रम्प यांचे हे विधान या प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे आणि ते सुरू असलेल्या राजनैतिक चर्चेचेही संकेत देते. ट्रम्प यांनी सांगितले की, पाकिस्तानी दूतांच्या माध्यमातून इराणसोबत थेट आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारची चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणमधून अंदाजे १,००० पौंड युरेनियम काढण्यासाठी लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहेत. ही एक गुंतागुंतीची आणि जोखमीची मोहीम असेल, ज्यामध्ये अमेरिकन सैन्याला अनेक दिवस किंवा त्याहून अधिक काळ देशात राहावे लागण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या या अशा विधानांनी युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता आता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.



























































