अहिल्यानगर जिल्हा बँकेसह तीन साखर कारखान्यांच्या निवडणुका दिवाळीनंतरच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सहकार विभागाने अहिल्यानगर आणि पुणे जिह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मे 2026पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. याबाबत सहकार विभागाने सोमवारी शासन आदेश जारी केला. या आदेशातून सहकारी गृहनिर्माण संस्थांना वगळण्यात आले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेसह ज्ञानेश्वर, मुळा आणि वृद्धेश्वर साखर कारखान्यांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत लांबवणार आहेत.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होत आहे. पोटनिवडणुकीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी मनुष्यबळाची अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आदेशात म्हटले आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतरची पहिली पदाधिकारी निवड करणे, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या राजीनाम्यामुळे अन्य पदाधिकाऱयांची निवड करणे, राजीनामा, मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर अन्य संचालकांची निवड करणे, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया, ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झाला आहे, अशा निवडणुकांना हा आदेश लागू राहणार नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत सोमवारी सायंकाळी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी स्वतंत्रपणे आदेश काढले आहेत.

ज्ञानेश्वर, मुळा आणि वृद्धेश्वर साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी 1 एप्रिलला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे जिह्यातील ‘अ’ व ‘ब’ वर्गातील संस्था आणि बँकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या निवडणुका 31 मेपर्यंत होणार नसून, त्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यात निवडणुका होत नसल्याने दिवाळीनंतर पावसाळा संपल्यावर आता जिल्हा बँकेसह ज्ञानेश्वर, मुळा आणि वृद्धेश्वर साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत.

श्रीरामपुरातील सोसायटय़ांची निवडणूक पुढे ढकलली

श्रीरामपूर तालुक्यातील ‘ब’ वर्ग विविध कार्यकारी विकास सोसायटय़ांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लावण्याच्या हालचाली जिल्हा सहकार विभागाने सुरू केल्या होत्या. मात्र, जिह्यातील ‘ब’ व ‘क’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश दिल्याने या सोसायटय़ांच्या निवडणुकाही आता दिवाळीनंतरच होणार आहेत.