
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर आखाती देशातील संकट अधिक गडद होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चीनने एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले असून एक शांतता चर्चा यशस्वी होण्यासाठी यात एन्ट्री केली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रदेशात चिरस्थायी शांततेसाठी चार-कलमी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्याचे महत्त्व वाढले आहे.
चीनच्या सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या (Xinhua) वृत्तानुसार, अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान बीजिंग दौऱ्यावर असताना हा प्रस्ताव सादर करण्यात आला. दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान, शी जिनपिंग यांनी आखाती देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक आराखडा सादर केला आणि चार-कलमी प्रस्तावही सादर केला.
पाकिस्तानमध्ये अमेरिका-इराण चर्चा अयशस्वी झाल्यानंतर जागतिक तणाव शिगेला पोहोचला आहे. आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चार-कलमी शांतता प्रस्ताव सादर करून एक राजनैतिक पाऊल उचलले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढते संकट, अमेरिकेची नाकेबंदी आणि ऊर्जा बाजारातील धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण आहे.
शी जिनपिंग यांच्या चार-कलमी प्रस्तावात प्रादेशिक शांततापूर्ण सहअस्तित्वाला प्राधान्य देणे, राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर करणे, विकास आणि सुरक्षा यांच्यात संतुलन राखणे आणि आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित व्यवस्थेचे संरक्षण करणे यावर भर देण्यात आला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जगात पुन्हा जंगलराज आणता येणार नाही.
चीनच्या राष्ट्राध्यक्षांची ही टिप्पणी अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवाईवरील अप्रत्यक्ष टीका म्हणून पाहिली जात आहे. चीनने यापूर्वी हे हल्ले बेकायदेशीर ठरवून त्यांचा निषेध केला असला तरी, यावेळी त्याने जागतिक व्यवस्थेबद्दल अधिक कठोर शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी जीवनरेखा मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी या संघर्षाचे केंद्र बनली आहे. इराणने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून, शत्रू देशांशी संबंधित मानल्या जाणाऱ्या जहाजांसाठी हा मार्ग बंद केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, अमेरिकेने इराणी बंदरांची नाकेबंदी सुरू केली आहे आणि तेहरानवर आर्थिक दबाव वाढवला आहे. या संघर्षाचा परिणाम जागतिक तेल बाजारात जाणवत आहे.
आखाती देशांमधून होणाऱ्या तेल पुरवठ्यात लक्षणीय घट झाली आहे. शिवाय, इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील काही ऊर्जा केंद्रांसह प्रादेशिक ऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावही वाढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर चीन इराणला शस्त्रपुरवठा करत असल्याचे आढळले, तर त्याला ५० टक्क्यांपर्यंत शुल्काचा सामना करावा लागू शकतो. त्यांनी या निर्णयाचे गंभीर परिणाम होतील असे म्हटले आहे. या तणावपूर्ण वातावरणात, अमेरिकेने बंदी घातलेला आणि चीनशी संबंधित असलेला ‘रिच स्टारी’ हा टँकर होर्मुझमधून प्रवास करताना दिसला. त्यामुळे नाकेबंदीबाबत चर्चा होत आहे. त्यामुळे आता हे युद्ध फक्त आखातासाठी मरायादीत राहिले नसून वाढत्या प्रमाणात जागतिक सत्तासंघर्षाचे केंद्र बनत आहे.


























































