
मध्य प्रदेशमधील सिंगरोली जिल्ह्यात दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर दरोडा पडला आहे. पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत घुसून अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो रुपयांची रोकड आणि सोने-चांदीच्या दागिन्यांची लूट केली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी बैढन परिसरामध्ये घडली. पाच शस्त्र दरोडेखोर मुखवटे घालून बँकेमध्ये शिरले. आत शिरताच बँकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि ग्राहकांवर बंदूक रोखून दहशत निर्माण केली, तसच सर्व कर्मचारी आणि ग्राहकांचे मोबाईल फोन जप्त केले. एवढेच नाही तर हवेत गोळीबारही करत लॉकरच्या चाव्यांची मागणी केली. त्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये 20 लाखांची रोड आणि 15 कोटी रुपयांची ऐवज लुटून पोबारा केला.
दरम्यान, हा सर्व प्रकार बँकेतील आणि बँकेबाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मुखवटा घातलेले व्यक्ती कर्मचाऱ्यांना धमकावताना दिसत आहेत. दरोडा टाकल्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून फरार झाले. दुपारी ऐन गर्दीच्या वेळी पडलेल्या या सशस्त्र दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Daylight armed robbery at Bank of Maharashtra in Singrauli, Madhya Pradesh: 5 masked men stormed the branch, assaulted staff, fired shots, and looted 9-10 kg of gold plus ₹20 lakh cash (total ₹30-35 lakh). CCTV captured the daring heist in broad daylight. pic.twitter.com/qDiW8zNulP
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 17, 2026
बँकेत उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने हा दरोड्याचा थरारक अनुभव सांगितला. मी आयुष्यात पहिल्यांदाच ओलीस ठेवण्याचा प्रकार अनुभवला. दरोडेखोरांनी मॅनेजरला धमकावत मारहाण केली. एका महिला कर्मचाऱ्याला तर ‘तू छत्तीसगडची आहेस ना? मी तिथे येऊन तुझ्या कुटुंबाला गोळ्या घालीन’ अशी धमकी दिली, असेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
दरम्यान, दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बँकेतील आणि बँकेबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात, दरोडेखोरांकडे बँकेची खडा न खडा माहिती असल्याचे समोर आले आहे. दरोडेखोरांनी थेट सोन्याचे दागिने ठेवलेल्या लॉकरला लक्ष्य केले. हे सोने ग्राहकांनी कर्ज घेण्यासाठी बँकेत गहाण ठेवले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या बँकेत घटनेच्या वेळी एकही सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. याचाच फायदा दरोडेखोरांनी घेतला.
आम्ही परिसरातील सर्व नाकाबंदी केली असून चार विशेष पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये दरोडेखोर दुचाकीवरून पळून जाताना दिसत आहेत. एक आरोपी हेल्मेट घालून होता, तर इतरांचे चेहरे उघडे होते.
मनीष खत्री, पोलीस अधीक्षक




























































