
आरक्षित क्रीडांगणावर प्रवासी शेड उभारण्याचा घाट घातला आहे. रोडचे काम करण्यासाठी मोठा खड्डा खोदला आहे. या कामामुळे सुरक्षा भिंत, पाण्याचे कनेक्शन, सांडपाण्याची पाइप तोडल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगर परिषदेने केलेल्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या रोडला स्थानिकांनी तीव्र विरोध केला असून शेडचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. जव्हार नगर परिषदेच्या सिटी सर्व्हे नंबर १४०३ मधील जागा विविध सार्वजनिक उपयोगासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या जागेत मुख्य कॉलनीचे समाज मंदिर, क्रीडांगण, मच्छी मार्केट तसेच संत गाडगे महाराज बालोद्यान व बाल क्रीडांगण तयार करण्याचे नियोजन आहे. मात्र याच जागेमध्ये क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भागात पक्की प्रवासी शेड उभारण्यासाठी नगर परिषदेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. या आधी ही निवारा शेड राजे यशवंतराव मुकणे चौकात बांधण्यात येणात होती. मात्र समोरच एक प्रवासी शेड असताना दुसरी कशाला असे म्हणून स्थानिकांनी त्याला विरोध केला होता.
अन्यथा तीव्र आंदोलन
शेडचे काम सुरू करण्यापूर्वी नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने जागेची मोजणी, आखणी, नकाशा तपासणी, हद्द निश्चिती करणे अपेक्षित होते. मात्र यातील काहीही न करता मनमानी पद्धतीने जागा निवडली आणि काम सुरू केले, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. तोडण्यात आलेली सुरक्षा भिंत तसेच नुकसानग्रस्त नळ, पाइपलाइन त्वरित दुरुस्त करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.



























































