
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात सोमवारी स्कॉर्पिओ गाडी सुमारे ७०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच रायगड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत २५४ रस्ते अपघातात ९९ जणांचा बळी गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. रायगड जिल्हा पोलिस दूरक्षेत्र हद्दीत दिवसाला जवळपास दोन ते तीन अपघात होत आहेत.
अपघाताची प्रमुख कारणे
महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे.
रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने.
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे.
कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसऱ्या बाजूला नेणे.
मद्य पिऊन वाहन चालविणे
धोकादायक वळणे.



























































