
जवळ्याला सध्या फुल्ल डिमांड आली आहे. पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्याने खवय्यांना सुक्या मासळीचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे स्थानिक बाजारासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत तसेच कर्नाटक, गोवा राज्यांत सुकटीला प्रचंड मागणी वाढली आहे. आतापर्यंत जवळपास सुमारे तीन हजार टन सुक्या जवळ्याची निर्यात झाली असून सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
समुद्राला पावसाळ्यात उधाण येते. त्यामुळे मासेमारीला या कालावधीत बंदी असते. जिल्ह्यात १ जूनपासून मासेमारी दोन महिने बंद असणार आहे.पावसाळ्यापूर्वी सुकी मासळी विकत घेऊन ती साठवून ठेवण्यावर भर दिला जात आहे. वाकटी, बोंबीलसह सुका जवळा खरेदी करून त्याची साठवण करून ठेवली जात आहे. सुका जवळा अर्थात सुकटीचा हंगाम मार्चपासून सुरू झाला आहे. जाळ्यात सापडलेला जवळा सुकवून तो साफ करून बाजारात विक्री करण्यात आला आहे. हा जवळा स्थानिक बाजारासह वेगवेळ्या देशभरातील बाजारपेठेत पाठवण्यात आला आहे.
दर चांगले मिळाल्याने दिलासा
रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरुड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जवळ्याची निर्यात करण्यात आली आहे. अपेक्षेपेक्षा चांगले दर यंदा जवळा विक्रीतून मिळाले आहेत. यावर्षी रायगड जिल्ह्यातील अनेक भागांसह महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर या जिल्ह्यांत तसेच कर्नाटक व गोवा या राज्यात सुक्या जवळ्याला मागणी वाढली. आतापर्यंत सुमारे तीन हजार टन जवळ्याची निर्यात झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यंदा जवळा मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा जवळ्याला भाव ही चांगले मिळाले, काही ठिकाणी शंभर, दीडशे तर काही ठिकाणी दोनशे रुपये किलोच्या भावाने सुका जवळा विकण्यात आला. रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत तसेच कर्नाटक, गोवा या राज्यांत सुमारे तीन हजार टन जवळ्याची निर्यात झाली आहे. – विजय गिदी माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ, मुंबई






























































