
‘इतक्या दिवसांपासून मोदींनी ताब्यात ठेवलेली देशाची व्यवस्था आता हलू लागली आहे, मोदींच्या हातून निसटली आहे, बंड करू लागली आहे, त्यांच्या विरोधातील माहिती फोडू लागली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षभरानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील,’ असा ठाम दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.
दिल्लीतील इंदिरा भवन येथे झालेल्या आदिवासी काँग्रेसला संबोधित करताना ते बोलत होते. ‘नरेंद्र मोदींबद्दल माझ्याकडे प्रचंड माहिती आहे. हे त्यांनाही माहीत आहे. मी जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा ते डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत. कारण व्यवस्थेवरील त्यांची पकड ढिली झाली आहे. देशाची व्यवस्था सरकारविरोधात बंड करू लागली आहे.
लोकांचा उठाव दडपण्याचा प्रयत्न सरकार करू शकतं. आणीबाणी लावू शकतं. शक्यता आहे. पण आता आपण पुढच्या टप्प्यात आहोत. आधी सगळं काही त्यांच्या ताब्यात होतं. आता त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलंय.
निवडणूक आयोग सरकारच्या पूर्ण नियंत्रणात होता. आता नाही. मुख्य निवडणूक आयुक्त, गुप्तचर संस्थांचे प्रमुख आणि न्यायव्यवस्थेतील काही ज्येष्ठ अधिकारी स्वतः मला मेसेज करत आहेत. आतील माहिती पुरवत आहेत,’ असा गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी केला.
नोकरशहांना जनतेच्या उठावाची भीती
‘सरकारच्या मर्जीनेच आपण कारभार करत राहिलो तर आपल्यालाच धोका आहे हे आता व्यवस्थेतील लोकांनाही कळून चुकले आहे. आर्थिक दबाव, गरिबी आणि वेदनांमुळे लोकांनी उठाव केला तर काय होऊ शकते याचा अंदाज त्यांना आला आहे. त्यांनाही भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे व्यवस्था हलू लागली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, अजित डोवाल, इतर मंत्री आणि त्यांच्या मुलांची सगळी माहिती मला अधिकारीच देत आहेत. धडाधड देत आहेत,’ असे राहुल म्हणाले.


























































