रायगडात विधान परिषद निवडणुकीवरून रण पेटले! तटकरेंवरून शिंदे गटात ‘तट’ कर्जत, खालापुरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी अजित पवार गटापेक्षा शिंदे गटाचे संख्याबळ जास्त असतानाही रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असतानाच शिंदे गटाचे आमदार मनोहर थोरवे हे अजित पवार गटाचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरण्यासाठी गेले. त्यामुळे थोरवेंच्या गोटातील तीन पदाधिकाऱ्यांनी आज थेट पदांचे राजीनामेच दिले. आमचा स्वाभिमान आम्ही अजून गहाण टाकलेला नाही, असे या तिघांनीही पाठवलेल्या राजीनामा पत्रात ठणकावून सांगितले आहे.

विधान परिषद निवडणुकीत रायगडमधील राजकारणात उलथापालथी होऊ लागल्या आहेत. एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेणारे आणि एकमेकांना संपवण्याचे विडे उचलणाऱ्या शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्यांनी हातमिळवणी केली आहे. या विधान परिषद मतदार संघात शिंदे गटाचे संख्याबळ आहे. त्यामुळे कोकणची जागा शिंदे गटाला मिळावी.

प्रतिस्पर्धी असलेल्या अजित पवार गटाला ही जागा मिळू नये, अशी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा अजित पवार गटाकडे गेली. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार अजित पवार गट आणि तटकरेंविरोधात बोलणारे शिंदे गटाचे नेते गप्प झाले. भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदात तटकरेंनीच खोडा घातल्याचा सर्वप्रथम आरोप कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला होता. सुनील तटकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरेंविरोधात प्रक्षोभर विधाने करणारे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे मंत्री उदय सामंत यांच्यासह अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास गेले. त्यामुळे रायगडात शिंदे गटातून नाराजीचा सूर उमटत आहे. रायगडात शिंदे गटातून नाराजीचा सूर उमटत आहे. त्याची सुरुवात कर्जत, खालापूर मतदार संघातून झाली आहे.

स्वाभिमान जिवंत आहे

ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून काम करायचे असेल तर आम्ही आमचा स्वाभिमान गहाण टाकलेला नाही. तो जिवंत आहे असे ठणकावत शिंदे गटाचे खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील, कर्जत युवा तालुकाध्यक्ष अमर मिसाळ आणि जिल्हा संघटक संभाजी जगताप यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या तिघांचे राजीनामे हा आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का मानला जात आहे.