Mumbai News – मालाडमध्ये दिवसाढवळ्या चाकूहल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मालाडमध्ये दिवसाढवळ्या चौघांवर चाकूहल्ला केल्याची घटना रविवारी घडली. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आप्पा पाडा परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आकाश धोत्रे असे मयत तरुणाचे नाव आहे. चाकू हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अन्य तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस अटक केलेल्या दोन आरोपींची चौकशी करत आहेत. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याबाबतही पोलीस तपास करत आहेत. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.