
भरधाव कारने समोरील डंपरला धडक दिल्याची घटना आज दुपारी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात घडली. हा अपघात इतका भीषण होता की यात एकाचा मृत्यू झाला. निकेश बालन असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
कल्याण येथे राहणारे निकेश बालन हे आईसह रत्नागिरीहून मुंबईकडे कारने जात होते. ते कशेडी घाटातील भोगाव हद्दीत आले असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार समोर असलेल्या डंपरवर जाऊन धडकली. या अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. निकेश आणि त्यांची आई लिसी बालन यात गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच कशेडी पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान निकेश बालन यांचा मृत्यू झाला. लिसी बालन या गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली.


























































