NEET UG Re-Exam 2026: हायटेक सुरक्षेलाही खिंडार! नीट फेरपरीक्षेत डमींचा सुळसुळाट; 30 जणांना घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात रविवारी 21 जून रोजी NEET- UG 2026 फेरपरीक्षा घेण्यात आली. यावेळी या परिक्षेदरम्यान कोणतीही गडबड होऊ नये यासाठी सरकारकडून खबरदारी घेण्यात आली होती. मात्र फेरपरिक्षेदरम्यान बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात सरकारच्या हायटेक सुरक्षेलाही खिंडार पडले आहे. येथील परीक्षा केंद्रांवर मूळ विद्यार्थ्यांच्या जागी ‘डमी’विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी मोठी कारवाई करत 9 डमी विद्यार्थ्यांसह 30 जणांना अटक केली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, डमी विद्यार्थ्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरूवात केली. तपासणीदरम्यान या बनावट परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश कसा मिळाला, असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित करण्यात आला. बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणाऱ्या एजन्सीच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आली. कागदपत्रे आणि फोटो पडताळणीदरम्यान संशयितांचे फोटो आणि बोटांचे ठसे मॅच झाले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचा संशय वाढला आणि तातडीने ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या लखीसरायमधील या घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले आणि त्यांनी इतर केंद्रातही तपासणी सुरू केली. केआरके उच्च विद्यालय परीक्षा केंद्रातून 1, केंद्रीय विद्यालयातून 7 आणि हसनपुर विद्यालय परीक्षा केंद्रातून 1 संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले सर्व तरुण इतर जिल्ह्यांतील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. एसडीएम प्रभाकर कुमार आणि एसडीपीओ शिवम कुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

एसडीपीओ शिवम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेदरम्यान एकूण 30 जणांना अटक करण्यात आले असून यापैकी 9 जण डमी म्हणून परीक्षा देत होते, तर उर्वरित 21 जण या संपूर्ण रॅकेटमध्ये सामील होते. चौकशीत मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांचे विशेष पथक संभाव्य ठिकाणांवर सातत्याने छापे टाकत आहे. या प्रकरणावर जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार आणि पोलीस अधीक्षक प्रेरणा कुमार स्वतः लक्ष ठेवून आहेत. हे नेटवर्क किती जिल्ह्यांमध्ये पसरले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.