
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीवरून देशभरात गोंधळाचे वातावरण असतानाच, या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या एका भामट्याला मध्य प्रदेशातील इंदूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय मालवीय असे या १९ वर्षीय आरोपीचे नाव असून तो स्वतः विधी शाखेच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. या तरुणाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच चॅटजीपीटीचा वापर करून नीट परीक्षेची बनावट प्रश्नपत्रिका तयार केली आणि तीच मूळ प्रश्नपत्रिका असल्याचे भासवून इन्स्टाग्रामवरून विद्यार्थ्यांची फसवणूक केली. या प्रकरणी इंदूर गुन्हे शाखेने त्याच्यावर फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
इंदूरचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय मालवीय हा लसुडिया परिसरातील रहिवासी आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक खाते उघडून आपल्याकडे नीट परीक्षेचा पेपर उपलब्ध असल्याचा खोटा दावा करत जाहिरातबाजी केली. विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने चॅटजीपीटी या एआय टूलच्या मदतीने हुबेहूब वाटणारे प्रश्न तयार केले आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घेऊन एक पीडीएफ तयार केली. हीच बनावट प्रश्नपत्रिका त्याने सोशल मीडियावरील लिंक्सचा वापर करून जवळपास २२ ते २५ विद्यार्थ्यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या एका पेपरसाठी त्याने विद्यार्थ्यांकडून ५० ते २०० रुपयांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे स्वीकारली असून, यातून त्याने सुमारे २५ ते ३० हजार रुपये कमावले आहेत.
सध्या सुरू असलेल्या परीक्षांच्या तणावाचा आणि विद्यार्थ्यांच्या संभ्रमाचा फायदा घेऊन हा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत अक्षयला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल आणि इतर डिजिटल साधने जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये अनेक पीडीएफ आणि ऑनलाइन व्यवहारांच्या नोंदी सापडल्या आहेत.

























































