
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शंभर वर्षे जुन्या केईएम रुग्णालयाचे नामांतर करण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे. मात्र शिवसेनेने याला जोरदार विरोध दर्शवला आहे. किंग एडवर्ड कसाबसारखा अतिरेकी होता का? केईएमचे नाव बदलण्याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल उपस्थित करत नामांतराचा प्रस्ताव रद्द करावा, अशी जोरदार मागणी शिवसेनेने विधान परिषदेत केली आहे.
परळ येथील केईएम अर्थात किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाचे नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्याचा प्रस्ताव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सादर केला आहे. डॉक्टरांच्या विविध संघटनांनीदेखील नामांतराला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. देशात प्लेगची साथ पसरल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी किंग एडवर्डने केईएम रुग्णालय उभारले. या व्यक्तीवर कुणाचा एवढा राग आहे की नाव बदलण्याचा घाट घातला जातोय. किंग एडवर्ड कसाबसारखा अतिरेकी होता का?, रुग्णालयाचे नाव बदलून किंग एडवर्ड यांचा मान सरकार कशाप्रकारे राखणार? असा सवाल मिलिंद नार्वेकर यांनी केला. केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्याऐवजी लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी आमदार अॅड. अनिल परब, सचिन अहिर, प्रवीण दरेकर यांनी केली.
दरम्यान, चर्चेत सहभागी झालेले मंत्री लोढा म्हणाले, किंग एडवर्डने काही पैसे दिले नव्हते. तो भारत लुटून इंग्लंडला गेला. किंग एडवर्ड हा कसाब होता. त्याने लाखो भारतीयांची कत्तल केली, असे विधान केल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला.
शहानिशा करून निर्णय घेऊ…
केईएम रुग्णालयाच्या नामांतराची काहींनी मागणी केली आहे, तर काहींनी विद्यमान नाव कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे. केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. हजारो विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर केईएमचे नाव आहे. विविध मान्यता आणि नोंदी या नावाशी संबंधित आहेत. त्यामुळे सर्व संबंधित बाबींची शहानिशा करूनच राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.





























































