
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक आणि इतर सवलती देण्याबाबत 5 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
आज विधान भवनात विखे पाटील अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला. मराठा समाजाच्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिह्यात तातडीने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात यावी. तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राप्त होणारी निवेदने तसेच मागण्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या थेट देखरेखीखाली वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना बैठकीत विखे पाटील यांनी दिली.
स्थानिक पातळीवरील मागण्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे. जिल्हा आणि तालुकास्तरीय तक्रार निवारण प्रक्रियेचा प्रत्येक आठवडय़ाला सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही करावी. त्याबाबतचा प्रगती अहवाल दर आठवडय़ाला शासनास सादर करावा, असे निर्देश दिले.






























































