
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी एक अत्यंत भीषण अपघात घडला. कानपूरहून वाराणसीच्या दिशेने जाणार्या एका एलपीजी गॅस टँकरला अचानक गळती लागली. ज्यामुळे टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. हा अनियंत्रित टँकर कोखराज-हंडिया बायपासवरील सिरोही टोल प्लाझाला अत्यंत वेगाने जाऊन धडकला. टोल बूथला धडकताच टँकरचा मोठा स्फोट झाला आणि त्याने भीषण पेट घेतला. या अपघातात टोल प्लाझाचे पाच कर्मचारी होरपळले. तर प्राण वाचवण्यासाठी चालत्या टँकरमधून उडी मारल्याने चालक आणि वाहक या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
हा अपघात इतका भयानक होता की, लागलेल्या आगीच्या ज्वाळा तब्बल दोन किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होत्या. टँकरच्या स्फोटानंतर टोलनाक्यावर एकच गोंधळ आणि आरडाओरडा झाला. गंभीर जखमी झालेले कर्मचारी रस्त्यावर वेदनेने विव्हळत होते. दुसरीकडे आगीचे तांडव पाहून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना बस आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या 84.7 किलोमीटर लांबीच्या प्रवेश-नियंत्रित महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या भीषण दुर्घटनेतून टोल प्लाझाचे सुमारे 10 कर्मचारी सुदैवाने वेळेत बाजूला झाल्याने बचावले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसराची नाकेबंदी करत वाहतूक थांबवली. या अपघातात हिरामन, आलोक, कृष्णा पाल, अतुल आणि राजू हे पाच टोल कर्मचारी होरपळले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून कौशांबी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



























































