Beed News – माजलगावात महायुतीत वाद पेटला, नाव न घेता प्रीतम मुंडेंचा सोळंकेंवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येवू लागले आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीच्या अंतर्गत वादात ठिणगी पडत असताना माजलगावमध्ये राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. पंकजा मुंडेंच्या जिवावर निवडून येवून सगळं फस्त करून, ढेकर देवून पंकजा मुंडेंवर गरळ ओकणार्‍या आमदारांना पुन्हा येवू द्यायचं नसेल तर शत प्रतिशत भाजपा हा नारा डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा, असे आवाहन माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी केले.

माजलगाव येथे आज शुक्रवारी भाजपाच्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी खासदार प्रीतम मुंडे या माजलगावमध्ये दाखल झाल्या होत्या. बुथप्रमुखांना मार्गदर्शन करताना प्रीतम मुंडे यांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर नाव न घेता निशाना साधला. प्रीतम मुंडे म्हणाल्या, येथून पुढच्या काळात पंकजा मुंडेंच्या जिवावर निवडून येवून सत्ता भोगून त्यांच्यावरच गरळ ओकणार्‍या आमदाराला पुन्हा विजयी होवू द्यायचं नसेल तर शत प्रतिशत भाजपा हा नारा डोळ्यासमोर ठेवा, असे आवाहन केले. गेल्या काही दिवसापासून माजलगाव मतदारसंघात सोळंके विरूद्ध मुंडे असा वाद पेटला आहे. काही दिवसापूर्वीच आ.प्रकाश सोळंके यांनी आपल्या पराभवासाठी पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर आज प्रीतम मुंडे यांनी प्रकाश सोळंकेंवर निशाना साधला. अलिकडच्या काळात महायुतीमध्ये अंतर्गत कलह प्रत्येक मतदारसंघामध्ये निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड, माजलगाव, गेवराई, केज या मतदारसंघात महायुतीतील धुसफूस अनेकदा चव्हाट्यावर आली आहे.