
अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्यावरील उत्तर प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्याला ‘वन बुरुज’ पुन्हा मजबुतीने उभा राहणार आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या डागडुजी व दुरुस्तीचे काम शास्त्रोक्त पद्धतीने सुरू केले आहे. यामुळे जीर्ण अवस्थेत पोहोचलेल्या या ऐतिहासिक वास्तूला नवसंजीवनी मिळणार असून रेवदंड्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारसाचे जतन होण्यास मोठी मदत होणार आहे.
किल्ल्याची तटबंदी सागरी लाटांच्या तडाख्याने ढासळण्यास सुरुवात झाली आहे. किल्ल्याचे अनेक अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तटबंदीवर ठिकठिकाणी झाडे उगवली आहेत. किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तूंची पडझड सुरू झाली आहे. पोर्तुगीज, मराठा आणि ब्रिटिश साम्राज्याचा साक्षीदार असलेला हा किल्ला अखेरची घटका मोजत आहे. अशातच केंद्रीय पुरातत्व विभागाने किल्ल्यावरील ‘वन बुरुज’च्या डागडुजी व दुरुस्तीचे काम शास्त्रोक्त पद्धतीने सुरू आहे. किल्ल्यावरील इतर तटबंदी तसेच इमारतींचीदेखील डागडुजी करावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने नागरिकांकडून होत आहे.
काम करताना विशेष काळजी
रेवदंडा संरक्षण सहाय्यक बजरंग येळीकर यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन कार्य हाती घेण्यात आले आहे. अत्यंत काळजीपूर्वक दगडी बांधकाम मजबूत करण्याचे काम सुरू असून मूळ स्थापत्याची ऐतिहासिक ओळख आणि वैशिष्ट्ये अबाधित राहतील याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. संवर्धनाच्या कामात प्रवेशद्वारावरील पोर्तुगीज क्राऊन शिल्प, दगडी कमान, तटबंदी, शिलालेख आणि कोरीव स्थापत्य घटकांचे संरक्षण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.




























































