
ओडिशातील प्रसिद्ध लिंगराज मंदिर परिसरात विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांना संरक्षित स्मारकावर परवानगीशिवाय ड्रोन उडवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) तसेच प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा, 1958 अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित ड्रोन आणि आरोपीने वापरलेली दुचाकी जप्त केली असून त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे. महादेवाला समर्पित असलेले लिंगराज मंदिर हे ओडिशातील अत्यंत श्रद्धेय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. असे वृत्त पीटीआयने दिले आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक असते.


























































