
मुसळधार पाऊस सुरू झाला की संगमेश्वर परिसराला पावसाचा वेढा पडतो. मात्र, यंदा या पावसासोबतच राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे प्रवाशांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात पावसाच्या पाण्याचे मोठे पाट वाहत असून संपूर्ण बस स्थानकाला चिखलाच्या साम्राज्याने वेढले आहे. महामार्गाच्या कामांतर्गत एसटी स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या सोनवी पुलाच्या बाजूने सेवा मार्ग तयार करताना ठेकेदाराने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या नियोजनशून्य कारभाराविरोधात प्रवासी जनतेतून तीव्र संताप आणि ठेकेदारावर थेट आरोप केले जात आहेत.
सोनवी पुलाच्या बाजूने सेवा मार्ग काढताना, पाऊस आल्यावर डोंगरउतारावरून वाहून येणारे पाणी सुरक्षितपणे बाहेर पडावे यासाठी पाण्याचा निचरा करणारी योग्य यंत्रणा किंवा गटारे उभारणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीने या तांत्रिक आणि मूलभूत बाबीकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. परिणामी, आता जसा जसा मुसळधार पाऊस पडतो, तसे तसे रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरउतारावरील पाणी आणि माती वेगाने थेट सेवा रस्त्यावर येत आहे. योग्य नियोजनाअभावी या सेवा रस्त्याला गटाराचे स्वरूप आले असून, हेच वाहते पाणी आणि चिखल थेट एसटी आगार आवारात घुसत आहे. ठेकेदाराने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी थातूरमातूर काम केल्याचा थेट आरोप आता स्थानिक नागरिक आणि प्रवासी करत आहेत.
पाऊस आल्यानंतर निर्माण होणाऱ्या या चिखलाच्या साम्राज्यामुळे संगमेश्वर आगारात येणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. वृद्ध, महिला, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थी यांचे पाय चिखलात रुतत असून, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने चालताना प्रवाशांचा तोल जाण्याचे प्रकार रोज घडत आहेत. हातामध्ये सामान आणि चिखलातून सुरक्षित वाट काढताना प्रवाशांची अक्षरशः दमछाक होत आहे.
चिखलातून घसरून किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात एखादा प्रवासी गंभीर जखमी झाल्यास अथवा बस पकडण्याच्या घाईत एखादा मोठा अपघात घडून न भरून येणारी हानी झाल्यावर संबंधित ठेकेदाराला आणि प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे. जर अशी दुर्घटना घडली, तर मात्र वेळ निघून गेलेली असेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

























































