FIFA World Cup 2026 – हॉलीवूडच्या भूमीवर फुटबॉलचा ब्लॉकबस्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fifa-world-cup-2026-kicks-off-today-mexico-vs-south-africa-opening-match

अमेरिकेची जगभर ओळख दोन गोष्टींसाठी आहे. एक हॉलीवूड आणि दुसरा थरार. हॉलीवूडमध्ये तीन तासांचा चित्रपट पाहताना प्रेक्षक शेवटच्या पाच मिनिटांपर्यंत नखं कुरतडत बसतो. पण काल फुटबॉल वर्ल्ड कपने हॉलीवूडलाच नम्रपणे सांगितलं, थरार लिहायचा असेल तर आमच्या मैदानावर या. कारण एका दिवसात जे घडलं, इतका भन्नाट, इतका अनपेक्षित आणि इतका हार्ट अटॅक आणणारा थरारक क्लायमॅक्स कोणताही पटकथाकार लिहू शकत नाही.

एका दिवसात तीन सामने… आणि तिन्ही सामन्यांनी हृदयविकारतज्ञांची प्रॅक्टिस वाढवली. सारखे ठोके चुकत होते. या सहा देशांत कितींना अॅडमिट करावे लागले आणि कितींनी प्राण गमावले, हे नंतर समोर येईलच. पण कालचा दिवस हृदय ठोके चुकवणारा आणि श्वास रोखणाराच होता.

या थराराचा पहिला अंक म्हणजे ब्राझील विरुद्ध जपान. ब्राझील म्हणजे फुटबॉलचं ताजमहाल. त्याचा प्रत्येक दगड इतिहासाचा आणि प्रत्येक वीट आत्मविश्वासाची. पण काल त्या ताजमहालाला जपानने हादरे दिले. जपानी खेळाडू इतक्या शिस्तीत खेळत होते की जणू प्रत्येकाच्या अंगात एकाच संगणकाचा प्रोग्रॅम बसवला होता. ब्राझीलच्या प्रत्येक चालीला त्यांच्याकडे उत्तर होतं. सांबाच्या तालावर नाचणाऱ्या ब्राझीलच्या पायात त्यांनी अक्षरशः बेडय़ा ठोकल्या. कारण जपानने ब्राझीलच्या छातीत भीतीचं पहिलं बीज पेरलं होतं. सानोचा पहिला गोल, मग दुसऱ्या हाफमध्ये काझेमिरोने ब्राझीलच्या जिवात जीव आणला. सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाणार असे वाटत असतानाच मार्टिनेलीच्या गोलने ब्राझीलच्या वर्ल्ड कप आव्हानाला जीवदान दिले. ब्राझीलला वाचवले.

हा थरार अजून अंगावरून उतरलेलाच नव्हता, तोवर दुसरा स्पह्ट झाला. जर्मनी आणि पॅराग्वेची झुंज पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेली. जर्मनीने आपली सुरुवात भन्नाट केली होती, पण इक्वाडोरची किक त्यांच्या मनावर जखम करणारी ठरली. तशी जर्मनीची ओळखच ‘भिंत’, पण प्रत्येक भिंतीला एक ना एक दिवस तडा जातोच. काल तो तडा पॅराग्वेने दिला नाही. पॅराग्वे बाद फेरीत नशिबाने पोहोचला होता. तो डी ग्रुपमधून बाद फेरी गाठणारा तिसरा सुदैवी संघ होता आणि त्याने जर्मनीच्या स्वप्नांवर सरळ बुलडोझर फिरवला. आधी एनसिसोने पॅराग्वेला आघाडीवर नेले तर हावटर्झने बरोबरी साधली, पण पुढे ते विजयी गोल ठोकू शकले नाही. परिणामतः हा थरारही शूटआऊटच्या कोर्टात पोहोचला. शूटआऊट आधीचा 100 मिनिटांचा खेळ जीवघेणाच होता. अक्षरशः जेम्स बॉण्डच्या थरारपटासारखा. दुसऱ्या गोलसाठी दोन्ही संघ एकमेकांच्या मागे धावत होते. मग पेनल्टी शूटआऊटमध्ये सारं समोर आलं. त्यानंतर प्रत्येक पेनल्टीसोबत जर्मनीचा आत्मविश्वास वितळत गेला आणि पॅराग्वेने इतिहासाच्या दारावर अशी लाथ मारली की जर्मन भिंत कोसळली. ढासळली. धुळीत मिळाली.

जर्मनीबद्दल एक गोष्ट कायम सांगितली जाते की, त्यांना हरवण्यासाठी फक्त चांगला खेळ पुरत नाही. नशीबही तुमच्या बाजूला हवं लागतं. कारण जर्मन संघ म्हणजे शिस्त, संयम आणि अचूकतेचं चालतं-बोलतं विद्यापीठ. पण काल पॅराग्वेने त्या विद्यापीठालाच प्रश्नपत्रिका बदलून दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये मज्जातंतूंचा खेळ. प्रत्येक पेनल्टी म्हणजे बंदुकीतून सुटणारी गोळी. एक चूक… आणि सगळं संपलं. आता वाटलं, आजचा थरार इथेच संपेल. पण वर्ल्ड कपला अजून एक धक्का राखून ठेवायचा होता. नेदरलँड्स विरुद्ध मोरोक्को.

नेदरलँड्स हा केवळ संघ नाही,  तो फुटबॉलच्या सौंदर्यशास्त्राचा अभ्यासक्रम आहे. त्यांच्या पासिंगमध्ये संगीत असतं, हालचालींमध्ये कविता असते. पण कविता लिहिणाऱ्यालाही कधी तलवारीसमोर उभं राहावं लागतं.

मोरोक्को काल तलवार बनून उतरला होता. आफ्रिकेच्या सिंहांनी पहिल्या मिनिटापासून डच खेळाडूंना श्वास घ्यायलाही वेळ दिला नाही. प्रत्येक टॅकल म्हणजे वीज, प्रत्येक धाव म्हणजे शिकारीवर झेपावणारा सिंह आणि प्रत्येक हल्ला म्हणजे विजयावरची सही. डचांचा चेंडूवरील ताबा उपयोगाचा ठरला नाही. अखेर अंतिम शिट्टी वाजली आणि हा थरारही पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. मग इथेही तीच हाणामारी झाली. कधी बंदूक मोरोक्कोकडे तर कधी डचकडे. पण मोरोक्कोने आपण आफ्रिकन सिंह असल्याचे ऑरेंज आर्मी दाखवून दिले. स्टेडियममधलं वातावरण भगवं असलं तरी ते मोरोक्कोने लाल करून टाकलं.

आजच्या दिवसाने विश्वचषकाचं खरं तत्त्वज्ञान पुन्हा समोर आणलं. इथे नाव मोठं असलं तरी उपयोग नाही. इतिहासाची जाडजूड पुस्तपं मैदानावर गोल करत नाहीत. रँकिंग चेंडू अडवत नाही. प्रतिष्ठा पेनल्टी वाचवत नाही. शेवटच्या शिट्टीपर्यंत ज्याच्यात धैर्य, संयम आणि जिंकण्याची भूक टिकते, तोच पुढे जातो.

ब्राझीलने अनुभवाच्या जोरावर जीव वाचवला. पॅराग्वेने जर्मनीची अभेद्य भिंत जमीनदोस्त केली. मोरोक्कोच्या सिंहांनी डचांचे स्वप्नच गिळंकृत केले आणि अमेरिकेच्या भूमीवर एका दिवसात असा फुटबॉलचा ब्लॉकबस्टर रंगला की, हॉलीवूडच्या सर्वात यशस्वी अॅक्शनपटालाही त्यापुढे इंटरव्हल घ्यावा लागेल. हे ब्लॉकबस्टर धमाके पुढेही क्षणाक्षणाला, पावलोपावली होणार आहेत. फक्त प्रत्येकाने आपापले हृदय सांभाळावे.