
इराकमध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत एक धक्कादायक आणि थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. इराकी संसदेच्या सदस्य हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल ५७ दशलक्ष डॉलर्स (जवळपास ४.७ अब्ज रुपये) रोख आणि २७ किलो शुद्ध सोने जप्त करण्यात आले आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, या सोन्यामध्ये सोन्याचे पाणी चढवलेले अंतर्वस्त्र देखील सापडले आहेत. यामुळे बगदादमध्ये खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही सध्या याचीच चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान अली अल-झैदी यांच्या सरकारने भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे सत्र सुरू केले असून या अंतर्गतच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरातून ५७ दशलक्ष डॉलर्स रोख आणि २७ किलोग्रॅम शुद्ध सोने हस्तगत करण्यात आले आहे. यात सोन्याच्या अंतर्वस्त्राचाही समावेश आहे. या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत आतापर्यंत खासदार आणि वरिष्ठ नोकरशहा यांच्यासह एकूण ४७ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
सुरक्षा दलांनी प्रामुख्याने बगदाद आणि इतर अनेक ठिकाणी पहाटेच्या सुमारास अचानक धाडी टाकून ही कारवाई केली. यामध्ये किमान ७ खासदार आणि अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी जाळ्यात आले आहेत. छाप्यात केवळ पैसा आणि सोनेच नाही, तर मोठ्या प्रमाणात रोकड, अत्याधुनिक लांब पल्ल्याची शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.
इराकच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, या व्यापक मोहिमेत माजी उपतेल मंत्र्यांशी संबंधित एका प्रकरणात सुमारे १० दशलक्ष डॉलर्स रोख, ३ अब्ज इराकी दिनार, सोन्याचे दागिने आणि जवळपास ४० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. सरकारी निधीचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. हा तपास अजून थांबलेला नाही, तर तो आणखी व्यापक केला जाईल आणि यामध्ये नवीन लोकांची नावे समोर आल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया इराकचे पंतप्रधान अली अल-झैदी यांनी दिली आहे.
अधिकृत दुजोरा नाही
खासदार हिंद अल-अब्बासी यांचे नाव इराकी संसदेच्या अधिकृत संकेतस्थळावरदिसत असले तरी त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या अंतर्वस्त्राबाबत आणि इतर साहित्याबाबत अद्याप तिथल्या अधिकृत सरकारी संस्थांकडून सविस्तर आणि अंतिम अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, या कारवाईमुळे इराकमधील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.


























































