
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मामला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चोरगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. या वाघाने काही दिवसांपूर्वीच परिसरातील एका शेतकऱ्याचा बळी घेतला होता, ज्यामुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. वाघ जेरबंद झाल्याने संपूर्ण परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांची मागणी आणि वन विभागाच्या पाठपुराव्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून वाघाला जेरबंद करण्याचे आदेश (परवानगी) देण्यात आले होते. आदेश मिळताच वन विभागाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. वाघाला पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी चोरगाव परिसरात पहिले भक्ष बांधले होते. वाघाने या भक्ष्याची शिकार तर केली, मात्र अत्यंत चलाकीने ती जंगलात ओढून नेली. यामुळे पहिल्या प्रयत्नात वन विभागाला हुलकावणी मिळाली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी रणनीती बदलून अधिक मजबूत पद्धतीने दुसरे भक्ष बांधले.
दुसरे भक्ष पाहताच वाघ पुन्हा त्या ठिकाणी आला. आधीच दबा धरून बसलेल्या वन विभागाच्या पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या थेट देखरेखीखाली, प्रसिद्ध शूटर अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत डार्ट गनद्वारे वाघाला भूलीचे औषध दिले. भूल दिल्यानंतर सुमारे दोन वर्षे वयाचा हा तरुण वाघ बेशुद्ध झाला. वन कर्मचाऱ्यांनी अत्यंत सुरक्षेची काळजी घेत त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर घटनास्थळावरच त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांच्या तपासणीत वाघाची प्रकृती उत्तम आणि समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले.
Chandrapur news – ताडोबाच्या बफर क्षेत्रात शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास pic.twitter.com/ZM4pX9N88Z
— Saamana Online (@SaamanaOnline) July 5, 2026
पुढील प्रक्रिया आणि देखरेखीसाठी या वाघाला तातडीने चंद्रपूर येथील ताडोबा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) येथे हलविण्यात आले आहे. वन विभागाच्या या यशस्वी आणि धाडसी कारवाईमुळे चोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, आता शेतकरी पुन्हा निर्भयपणे शेतात जाऊ शकणार आहेत.




























































