
जम्मू-कश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी रात्रभर थांबवलेली मोठी दहशतवादविरोधी मोहीम रविवारी सकाळी पुन्हा सुरू केली आहे. लश्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित संघटनेचे दोन दहशतवादी एका बागेत लपून बसले असून सुरक्षा दलांनी त्यांना चहुबाजूंनी घेरले आहे.
दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा आज दुसरा दिवस आहे. हिंदुस्थानी लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी संयुक्तपणे शोपियानच्या मीमंदर भागात कडक नाकेबंदी केली आहे. शुक्रवारी पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांमध्ये हे दहशतवादी पहिल्यांदा दिसले होते.
अडकलेल्या या दोन दहशतवाद्यांची नावे झाकीर आणि लतीफ अशी असून, ते दोघेही दक्षिण कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. झाकीर हा 2024 पासून लश्कर-ए-तोयबाशी जोडलेला आहे, तर लतीफ गेल्या वर्षीच या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. यातील झाकीर गनी हा सुरक्षा यंत्रणांच्या यादीत ए++ श्रेणीतील अत्यंत धोकादायक दहशतवादी म्हणून वर्गीकृत आहे. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये वॉन्टेड असून, ऑक्टोबर 2025 मध्ये कुलगाममधील एनआयए न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जाहीर नोटीस देखील जारी केली होती.
बागांमधील झाडे अतिशय दाट असून अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी पळून जाऊ नये, म्हणून लष्कराच्या विशेष काउंटर-इन्र्जन्सी युनिट व्हिक्टर फोर्सने अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. रात्रीच्या वेळी दहशतवाद्यांना अंधाराचा फायदा मिळू नये म्हणून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर हाय-तीव्रतेच्या दिव्यांनी प्रकाशमय केला आहे.
शनिवारी रात्रीपासून काय घडले?
सुरक्षा दलांची तुकडी जेव्हा या भागाचा शोध घेत पुढे जात होती, तेव्हा लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक सुरू झाली. सुरुवातीला दोन्ही दहशतवादी मारले गेले आहेत, असे वृत्त आहे. मात्र, रविवारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, दोघेही अजून जिवंत असून बागेतच अडकले आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सुरक्षा दलांनी शनिवार संध्याकाळपर्यंत आसपासची चार गावे रिकामी करून सुरक्षित केली आहेत.




























































