
शनिवारी दिवसभर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसाने राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण केली आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने रविवारी सकाळी पुराचे पाणी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जवाहर चौकात शिरले. यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पुराच्या पाण्यामुळे जवाहर चौकातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.शहरातील अनेक टपऱ्या आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. तसेच, खालील मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. राजापूर,गोठणे दोनिवडे,सौंदळ मार्ग: हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.येथील वाहतुकीवरही पुराचा मोठा परिणाम झाला आहे.
संततधार पावसामुळे ग्रामीण भागातही घरांचे नुकसान झाले आहे. नाटे-बाणेवाडी येथे भागीरथी चव्हाण यांच्या घरावर, तर कातळी गावात अ. रहीम सोलकर यांच्या घरावर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याशिवाय अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वीजवाहिन्या तुटल्या आहेत, परिणामी अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कशेळी येथील ‘देवघळी बीच सनसेट पॉइंट’ पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.पुराचा धोका लक्षात घेऊन शहरातील नदीकाठावरील व्यापाऱ्यांनी आपला माल आधीच सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले आहे. महसूल,पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून प्रवास टाळावा आणि अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





























































