राम मंदिरातील देणगी घोटाळ्या प्रकरणी संघाची प्रतिक्रिया लज्जास्पद आणि निषेधार्ह, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणात हजारो कोटी रुपयांच्या देणगीचा अपहार झाल्याचा आरोप करत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली.

जयराम रमेश म्हणाले की, राम मंदिरातील देणगीची चोरी झाल्याबाबत कोणतीही शंका किंवा वाद राहिलेला नाही. या प्रकरणावर संघाने दिलेली प्रतिक्रिया लज्जास्पद आणि निषेधार्ह असल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रामाणिकपणा, सचोटी आणि राष्ट्रवादाचे दाखले इतरांना देणारे लोकच आता उघडे पडले आहेत. राम मंदिरासाठी जमा झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या देणगीचा अपहार आणि अफरातफर झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी करत जयराम रमेश म्हणाले की, 22 जानेवारी 2024 रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचे श्रेय घेतले होते. मात्र, त्यानंतर भाजपला अयोध्या लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आता पंतप्रधानांनी स्वतः भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.