
दापोली तालुक्यातील असोड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू झाला, तर दुसरी गाय गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
असोंड येथील शेतकरी सचिन कुळे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या दोन गायी गावाजवळील परिसरात चरण्यासाठी सोडल्या होत्या. संध्याकाळी त्यापैकी एक गाय जखमी अवस्थेत घरी परतली, मात्र दुसरी गाय परत न आल्याने ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली.
जवळील पेसनी मळखंड परिसरात शोध घेत असताना बिबट्याने ठार करून फस्त केलेल्या अवस्थेत गायीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. वनाधिकारी शुभांगी गुरव यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून जखमी गायीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे असोंड परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या बिबट्याच्या वावरामुळे शेतात काम करणे तसेच जनावरे चारण्यासाठी नेणे धोकादायक बनले आहे. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.






























































