
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपीचे झालेले एन्काऊंटर पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे सांगत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी बुधवारी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. बंगाल आता यूपी २.० बनला असून, येथे कायद्याच्या राज्याचे रूपांतर जंगलराजमध्ये झाल्याचा घणाघात त्यांनी केला. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना महुआ मोईत्रा यांनी प्रभास मंडल या आरोपीच्या एन्काऊंटरवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, आज जे काही घडले ते कोणत्याही सुसंस्कृत देशात अजिबात स्वीकारार्ह नाही. आपण काही रक्तपिपासू राष्ट्र नाही. देशात कायद्याचे राज्य आहे. न्याय मिळवून देण्याची ही पद्धत असू शकत नाही. एखाद्या व्यक्तीवर आरोप ठेवला, त्याला कोठडीत घेतले आणि त्याच दिवशी त्याला गोळ्या घालून ठार मारले, हा न्याय नाही. हा पीडितेसाठी न्याय नाही, तिच्या आई-वडिलांसाठी नाही आणि समाजासाठीही नाही. हे कायद्याच्या राज्याला धरून नसून, हे केवळ जंगलराज आहे.
या प्रकरणातील तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मोईत्रा पुढे म्हणाल्या की, प्रभास मंडल हा मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. त्यानेच पोलिसांना पीडितेपर्यंत पोहोचवले होते आणि इतर आरोपींची नावेही सांगितली होती. कोठडीत असताना त्याने राजा नावाच्या एका व्यक्तीचे नाव घेतले होते. तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. पोलिसांनी त्याला गुन्ह्याच्या दृश्याच्या पुनर्निर्माणासाठी नेले होते, अशा वेळी त्याचे संरक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य होते. फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून तो दोषी आढळल्यास त्याला कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी होती.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारुईपूरमध्ये १२ वर्षीय मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य संशयित प्रभास मंडल याचा बुधवारी सकाळी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. बारुईपूरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, गुन्ह्याच्या दृश्याचे पुनर्निर्माण करत असताना आरोपीने एका अधिकाऱ्याची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांच्या पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मंडल गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.




























































