
पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी आज आक्रमक भूमिका घेत पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप महायुतीला सळो की पळो करून सोडले. मुंबईतील नागरी समस्यांवर बोलविण्यात आलेल्या विशेष बैठकीला पालिका आयुक्त अश्विनी भिडे उपस्थित नसल्याने शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्तांना बोलवा, अतिरिक्त आयुक्त नको, अशी मागणी केली. त्याचबरोबर मुंबईची तुंबई होण्यास जबाबदार असणाऱया महापौर रितू तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुंबईत पहिल्याच पावसात झाडे, मॅनहोल आणि घरे पडून 12 नागरिक मृत्युमुखी पडले. याविरोधात मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पावसाळ्यातील उपाययोजना आणि खबरदारी यासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आयुक्तांना बोलवा अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्याने सभागृहात एकच गदारोळ झाला. परिणामी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर आयुक्त सभागृहात येतील असे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर विशेष बैठक पुन्हा सुरू झाली.
या मुद्दय़ावर शिवसेना नगरसेवक यशोधर फणसे म्हणाले, आयुक्तांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकायला सभागृहात असायला हवे. यापूर्वी असे व्हायचे नाही. खरे तर महापौरांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे. नगरसेवक श्रद्धा जाधव म्हणाल्या, रस्ता काँक्रीटीकरणाने झाडांना धोका होतो. हा धोका होऊ नये म्हणून धोरण 2017 साली झाले होते त्याचे काय झाले? पालिका प्रशासनात समन्वय नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सिमेंट-काँक्रीटीकरणाने झाडे पडतात याबाबत आयुक्त आणि महापौर यांच्यात एकवाक्यता नाही. मुंबईला कुणी वाली नाही, अशी टीका नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली.
जुलै महिना आला तरी मॅनहोलमध्ये जाळ्या बसवण्याचे काम सुरू आहे. बसवलेल्या जाळ्या गंजल्या आहेत, मुंबईतील सर्व मॅनहोलचे जीपीएस ट्रकिंग करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी केली.
हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता तरी शाळा तत्काळ का बंद केल्या नाहीत, असा सवाल नगरसेविका विशाखा राऊत यांनी उपस्थित केला.
मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी ख़ड्डय़ांमुळे महापालिकेची बदनामी होत असल्याचे सांगत 70 टक्के काँक्रीटीकरणाचा दावा सरकारकडून केला जातोय मग खड्डे पडतात कसे, असा सवाल केला. काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी नुकसानभरपाईचे धोरण काय आहे याबद्दल विचारणा केली. दुर्घटनांना जबाबदार कंत्राटदारांकडून नुकसानभरपाई घ्या, अशी सूचना केली.
काँग्रेसच्या नगरसेवकांचा काळे कपडे घालून निषेध
काँग्रेसच्या नगरसेवकांनी पावसाळ्यात घडलेल्या दुर्घटनांबद्दल जबाबदार असलेल्या सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाचा काळे कपडे घालून निषेध केला. काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारात काळे फुगे लावण्यात आले होते.
‘राम मंदिर के चोरों को, जुते मारो सालोंको…
विशेष सभेला सुरुवात होताच भाजपाच्या नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. विरोधकांनीही ‘जय जय श्रीराम’चा जोरदार नारा दिला. तसेच ‘राम मंदिर के चोरों को, जुते मारो सालोंको’ अशी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱयांना जेरीला आणले. दोन्ही बाजूंनी जोरदार नारे देण्यात आले.





























































