पिंपरीत 550 कोटींच्या शालेय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, मंत्र्याला 55 कोटी टक्केवारी; चौकशीसाठी संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिंपरी-चिंचवड पालिकेतील साडे पाचशे कोटींच्या शालेय साहित्य खरेदीत कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून 55 कोटी रुपयांची टक्केवारी एका बडय़ा मंत्र्याला पोहोचली आहे, याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे लक्ष वेधत चौकशीची मागणी केली आहे.

‘‘शालेय साहित्याच्या खरेदीमध्ये मंत्री, अधिकारी सुप्रीम कोर्टाला जुमानत नाहीत, कोर्टाने आखून दिलेल्या तत्त्वानुसार काम करत नाहीत. साहित्याच्या एका नगामागे 574 रुपयांचा फरक आहे. शेकडो कोटींचा हा भ्रष्टाचार असल्याचे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही नगरसेवक मला भेटले. प्राथमिक माध्यमिक शाळांमधून शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, ओढणी, शालेय स्वेटर, मोजे, रेनकोट, दप्तरे वगैरे खरेदी ही नियमानुसार ‘ई टेंडर’द्वारे झाली नाही. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीची लूट झाल्याची त्यांची भावना आहे. नियमानुसार निविदा प्रक्रियेत ‘खरेदी’ किंमत 3 लाखांपेक्षा जास्त असेल तेव्हा ‘ई निविदा’ प्रणालीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण सोलापूरच्या जगदंबा रेडिमेड ड्रेसेस सहकारी संस्थेला परस्पर कोटय़वधीचे काम देऊन नियमाचा भंग केला असे या प्रकरणात दिसत असल्याचे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.