रोहा रेल्वे उड्डाणपुलाच्या खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी; संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहा रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेला आहे. संकेत कोतवाल असे मृत तरुणाचे असून तो भातसई गावचा रहिवासी होता. भातसईहून रोह्याकडे जात असताना अष्टमी रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला. याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी रोहा-नागोठणे मार्ग रोखून धरत प्रशासनाला जाब विचारला. खड्यांमुळेच तरुणाचा बळी गेल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृताच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली.

गेल्या साडेचार वर्षांपासून रोहा रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो. पर्यायी मार्गावरही जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून येथून जावे लागते. गुरुवारी सायंकाळी संकेत कोतवाल दुचाकीवरून रोह्याकडे जात होता. पर्यायी रस्त्यावर आला असता दुचाकी खड्ड्यात आदळून तो कोसळला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने त्याला चिरडले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर अष्टमी रेल्वे फाटकाजवळ ठिय्या आंदोलन करून रोहा-नागोठणे मार्ग रोखून धरला. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामातील हलगर्जीपणा आणि पर्यायी रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच तरुणाचा बळी गेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. ‘संकेतला न्याय मिळालाच पाहिजे’, रेल्वे ठेकेदार हाय हाय, ढिम्म प्रशासनाचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनस्थळी रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख आणि पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी धाव घेतली.