शक्तिपीठविरोधात शेतकऱ्यांची सद्बुद्धी पायी यात्रा; शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत वाखरी ते पंढरपूर निघणार पायी यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या नागपूर-गोवा शाक्तिपीठ महामार्गामुळे राज्यातील सुपीक शेतजमीन, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. या विनाशकारी महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा, या मागणीसाठी आता आंदोलनाच्या पुढील टप्प्यात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील 13 जिल्ह्यातील बाधित शेतकरी एकत्र आले आहेत. दि. 18 जुलै रोजी पंढरपूर येथील ऐतिहासिक वाखरी पालखी तळ येथे सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर वाखरी ते पंढरपूर अशी शेतकऱ्यांची पायी सद्बुद्धा यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तिपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात विठ्ठल चरणी एकत्र येत आहेत. शेतकऱ्यांची सोन्यासारखी सुपीक जमीन हिरावून घेणारा हा शाक्तिपीठ महामार्ग राज्य सरकारने त्वरित रद्द करावा आणि मुख्यमंत्री महोदयांना हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची सुबुद्धी पांडुरंगाने द्यावी, अशी सामूहिक मागणी आणि प्रार्थना या सद्बुद्धी यात्रेच्या माध्यमातून शेतकरी विठुरायाकडे करणार आहेत.

यापूर्वीही या 13 जिल्ह्यात विविध पातळ्यांवर मोर्चे, धरणे आंदोलने आणि ग्रामसभांमध्ये तसेच जिल्हा परिषद, नगरपालिकांमध्ये महामार्गाविरोधात ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, सरकारने अद्याप हा प्रकल्प अधिकृतपणे आणि पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी आषाढी वारीत शेतकऱ्यांनी ‘पांडुरंग’चरणी न्याय मागण्याचे ठरवले आहे. 18 जुलै रोजी वाखरी येथील सभेत आंदोलनाची पुढील दिशा आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जाणार आहे.

या सद्बुद्धी यात्रेस राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, महादेव जानकर, आमदार कैलास पाटील, कॉम्रेड गिरीश फोंडे यांच्यासह वरील सर्व जिह्यातील शक्तिपीठ विरोधी विविध पक्षांचे आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.

हा लढा केवळ जमीन वाचवण्याचा नसून शेतकऱ्यांचे अस्तित्व, संस्कृती आणि रोजगार वाचवण्याचा आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग बाधित 13 जिल्ह्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुण शेतकऱ्यांनी वाखरी (पंढरपूर) येथे मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

शक्तिपीठ महामार्गामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतजमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे पिढय़ान्पिढय़ा शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. या महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसताना देवेंद्र फडणवीस 50 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी व केवळ कंत्राटदार आणि भांडवलदारांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.