भूकंपाचा केंद्रबिंदू औंढ्याकडे सरकला! शनिवारीही जमिनीतून प्रचंड गडगडाट; हिंगोली जिल्हा प्रचंड दहशतीखाली, आपत्ती व्यवस्थापनाला लागली काळझोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सचिन कावडे

भूकंपाच्या हादऱ्यांची मालिका शनिवारीही सुरू राहिली. सकाळी ११.२६ मिनिटांनी भूगर्भात प्रचंड गडगडाट झाला आणि काही क्षण जमीन हलली. रिश्टर स्केलवर ३.५ एवढी नोंद झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील वसई येथे होता. गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता, मात्र आता तो औंढ्याकडे सरकल्याने या भागात चिंतेचे वातावरण आहे.

दोन दिवसांपूर्वी हिंगोली, नांदेड तसेच परभणी, लातूर जिल्ह्याला लागोपाठ चार भूकंपाचे धक्के बसले. नेहमीप्रमाणे या भूकंपाचा केंद्रबिंदू पांगरा शिंदे येथे असेल असा आपत्ती व्यवस्थापनाचा समज होता, मात्र हा केंद्रबिंदू औंढा नागनाथकडे सरकल्याचे दिसून आले. काकडधाबा आणि वसई येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अतिशय धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किमी खोल होता, तर आज झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पाच किमी आत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हिंगणी, दुर्ग धामणी, येडूद, कंजारा, जामगव्हाण, काकडधाबा, पिंपळदरी, नांदापूर, राजदरी आदी गावांना हा हादरा जाणवला.

आपत्ती व्यवस्थापन डाराडूर

हिंगोली जिल्ह्याला वर्षभरात अनेक हादरे बसले. त्यातील या महिन्यात जाणवलेले दोन हादरे हे आतापर्यंत बसलेल्या धक्क्यांपेक्षा जास्त तीव्रतेचे होते. रिश्टर स्केलवर या धक्क्याची नोंद ४.७ एवढी झाली होती. काही घरांची पडझड झाली, काही घरांना तडे गेले. भूकंपाच्या धक्क्यांनी घाबरून जाऊ नये, असे सांगून आपत्ती व्यवस्थापन डाराडूर झोपले. भूकंपासारख्या आपत्तीत काय उपाय करावेत, याची जनजागृती करण्याचे भानही या विभागाला नाही.

केंद्रबिंदू सरकल्याचेही भान नाही

औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान. या ठिकाणी वर्षातील बाराही महिने भाविकांची गर्दी असते. अत्यंत प्राचीन असे हे मंदिर यादवकालीन असून तेराव्या शतकातील आहे. वादळवारे, तुफानी पावसातही मंदिर टिकून राहिले. मात्र भूकंपाचा केंद्रबिंदू औंढ्याकडे सरकल्यामुळे मंदिराच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘लायगो’ प्रकल्पही धोक्यात

ब्रह्मांडाची उत्पत्ती शोधण्यासाठी जगभरातील देशांनी मिळून ‘लायगो’ या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. भूकंपीय स्थिरता, सपाट भूभाग आणि आदर्श भौगोलिक स्थानामुळे हा प्रकल्प हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ येथे उभारण्यात येत आहे. गुरूत्वीय तरंग शोधणारी ही जगातील पाचवी प्रयोगशाळा आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू औंढ्याकडे सरकल्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दलही चिंता व्यक्त होत आहे.