
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता जम्मू-कश्मिरमधील माता वैष्णोदेवी मंदिरातील चांदीच्या अर्पणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सुमारे 550 कोटी रुपयांच्या चांदीपैकी तब्बल 95 टक्के धातू बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जम्मूच्या मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने जम्मू-काश्मीर गुन्हे शाखेला (क्राईम ब्रांच) संबंधित सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे.
मे महिन्यात श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने मंदिरात जमा झालेली सुमारे 20 टन चांदी वितळवण्यासाठी आणि सुरक्षित साठवणुकीसाठी सरकारी टांकसाळीत पाठवली होती. या चांदीची अंदाजे किंमत 550 कोटी रुपये होती. मात्र, धातूची तपासणी करताना धक्कादायक बाब समोर आली. पाठवण्यात आलेल्या चांदीपैकी केवळ 5 टक्केच शुद्ध चांदी असल्याचे निष्पन्न झाले, तर उर्वरित धातूमध्ये कॅडमियम आणि लोखंडाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्याचे सांगण्यात आले आहे.
सुरुवातीला भाविकांनी नकळत बनावट चांदी अर्पण केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अॅडव्होकेट दीपक शर्मा यांनी हा दावा फेटाळून लावत मंदिरात अर्पण झालेल्या खऱ्या चांदीची अदलाबदल करून तिचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी 9 मे रोजी जम्मू-कश्मिर गुन्हे शाखेच्या महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करून गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, अपहार आणि सरकारी नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणी एफआयआर दाखल करून सखोल तपास करण्याची मागणी केली.
गुन्हे शाखेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी जम्मूच्या मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली. गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात तक्रार पुढील मंजुरीसाठी श्रीनगर येथील मुख्यालयाकडे पाठवली असून आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मात्र, तक्रारदाराने कायद्यानुसार एफआयआर नोंदवणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तक्रारदाराने मंदिरात जमा झालेल्या चांदीचे संकलन, साठवणूक, वाहतूक, तपासणी आणि वितळवण्याशी संबंधित सर्व नोंदी, सीसीटीव्ही फुटेज, धातू तपासणी अहवाल, इलेक्ट्रॉनिक डेटा आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याला 29 जुलै रोजी सर्व कागदपत्रांसह वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
दीपक शर्मा यांनी सांगितले की, कटरा येथील त्रिकुट पर्वतावरील माता वैष्णोदेवी मंदिरात दरवर्षी 90 लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. अनेक भाविक सोने-चांदीचे दान करतात. असे असताना भाविक जाणूनबुजून बनावट चांदी अर्पण करतील, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे खऱ्या चांदीची अदलाबदल झाली का, की दुसऱ्या कोणत्या प्रकारे हा गैरव्यवहार झाला, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. सुरुवातीला 550 कोटी रुपयांची मानली गेलेली चांदी तपासणीनंतर अवघी 30 कोटी रुपयांची असल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणामागे मोठा गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


























































