
वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न उपांत्य फेरीत चक्काचूर झालं. सुवर्णपदक हातातून निसटलं. पण इंग्लंडने निराशेचा डोंगर छातीवर ठेवून बसण्यापेक्षा तो राग फ्रान्सवर काढला. दुधाची तहान ताकावर भागवली खरी, पण तब्बल 60 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक जिंकत इंग्लिश सिंहांनी ब्राँझचा धमाका केला. गोलांचा अक्षरशः पाऊस पाडणाऱया या सामन्यात इंग्लंडने फ्रान्सला 6-4 अशी धूळ चारली. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला बुकायो साका. त्याने झंझावाती हॅटट्रिक साकारत फ्रेंच बचावफळीचा अक्षरशः चुराडा केला.
सामन्याच्या तिसऱयाच मिनिटाला डेक्लन राईसने दूरवरून झाडलेल्या भेदक फटक्याने इंग्लंडचे खाते उघडले. त्यानंतर एझ्री कॉन्साने हेडरवर दुसरा गोल ठोकला. फ्रान्स सावरायच्या आत साका वादळ बनून धडकला. त्याने प्रतिआक्रमणावर तिसरा गोल झळकावला आणि पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत आणखी एक गोल करत इंग्लंडला 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पहिल्या 45 मिनिटांत इंग्लंडने फ्रान्सला अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडले.
मध्यंतरानंतर प्रशिक्षक दिदिएर देसाँ यांनी चार बदल करत फ्रान्समध्ये नवसंजीवनी फुंकली. त्याचा परिणामही तत्काळ दिसला. किलियन एम्बाप्पेने स्पर्धेतील नववा गोल करत पुनरागमनाची नांदी दिली. ब्रॅडली बाकाxलाने आणखी एक गोल झळकावत सामना रंगतदार केला. त्यानंतर मायकेल ओलिसेच्या अचूक पासवर एम्बाप्पेने दुसरा गोल ठोकत वर्ल्ड कप इतिहासातील 22 वा गोल नोंदवला. या गोलासह त्याने लिओनेल मेस्सीचा सर्वाधिक वर्ल्ड कप गोलांचा विक्रम मोडला, पण या विश्वविक्रमालाही पराभवाची काळी किनार लागली.
फ्रान्स बरोबरीच्या दिशेने धावत असतानाच मालो गुस्टोने डजेड स्पेन्सला पाडले आणि इंग्लंडला पेनल्टी मिळाली. साकाने कोणताही दबाव न घेता चेंडू जाळय़ात धाडला आणि आपल्या कारकीर्दीतील संस्मरणीय
हॅटट्रिक पूर्ण केली. फ्रान्सकडून ओस्मान डेंबेलेने चौथा गोल करत शेवटचा प्रयत्न केला, मात्र अखेरच्या क्षणी ज्यूड बेलिंगहॅमने अप्रतिम वैयक्तिक काwशल्य दाखवत सहावा गोल झळकावला आणि इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या गोलासह बेलिंगहॅम वर्ल्ड कपमध्ये सात गोल करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला. उपांत्य फेरीतील पराभवाची जखम पूर्णपणे भरली नसली तरी 1966 नंतर प्रथमच वर्ल्ड कपमध्ये पदक जिंकत इंग्लंडने ब्राँझची ऐतिहासिक कमाई केली. दुसरीकडे, तब्बल 14 वर्षे फ्रान्सचे प्रशिक्षक राहिलेल्या दिदिएर देसाँ यांच्या कारकीर्दीचा शेवट पराभवाने झाला. एम्बाप्पेने विश्वविक्रम केला, पण शेवटी इतिहासात नोंद झाली ती साकाच्या ब्राँझ धमाक्याची.





























































